हिंजवडी : पुढारी वृत्तसेवा : हिंजवडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विशाल साखरे यांच्यासह माजी उपसरपंच प्रतीक्षा घोटकुले-जांभुळकर आणि शुभांगी सुरज साखरे या 3 सदस्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यांच्या विरोधकांनी विविध प्रकरणात त्यांच्या विरोधात तक्रार केली होती. अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अमित राठोड यांनी त्यांना अपात्र ठरवले आहे. या निर्णयाने पुन्हा एकदा ग्रामपंचायत स्तरावर न्यायालयीन लढाई सुरू झाल्याची चर्चा होत आहे. मागील पंचवार्षिक देखील आयटी नगरी हिंजवडी ग्रामपंचायतीच्या कामामध्ये न्यायालयीन प्रक्रियेमुळे पाच वर्षे अडचण निर्माण होत होती.
माजी सरपंच विशाल साखरे यांच्या विरोधात दिनेश सुरेश साखरे व सागर दत्तात्रय साखरे यांनी 10 डिसेंबर 2021 रोजी अपील केले होते. त्यांचे मल्हारी साखरे यांना विकलेल्या मिळकत क्रमांक 184 यामध्ये हितसंबंध असल्याची बाब आढळली होती आणि या मिळकतीची बिले मुदतीत भरली नसल्याने त्यांना अपात्र ठरवले.
अशाच दुसर्या एका प्रकरणी अमोल विठ्ठल साखरे यांनी शुभांगी साखरे यांच्या विरोधात अपील केले होते. त्यांनी देखील स्वतः राहत असलेल्या मिळकतीचा कर मर्यादित कालावधी उलटल्यानंतर भरल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अपात्र ठरवले आहे. त्यांचे पती सूरज साखरे यांना 6 जून 2021 रोजी मिळाली असलेली मिळकत बिले 30 सप्टेंबर 2021 रोजी भरली होती. तर उज्ज्वला अजित साखरे यांनी माजी उपसरपंच प्रतीक्षा घोटकुले-जांभुळकर यांच्या विरोधात अपील केले होते. त्या शासकीय गायरान जागेत राहत असल्याचे सिद्ध होत असल्याचे निकालात नमूद करण्यात आले आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या 3 विद्यमान सदस्यांना काम करण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे.
अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी दिलेला निर्णय न्याय्य आहे. ग्रामपंचायत स्तरावर काम करताना शिस्त महत्त्वाची आहे. योग्य वेळीच कर भरणे देखील गरजेचे आहे.
-मयूर साखरे, ग्रामपंचायत सदस्य, हिंजवडीसंबंधित निर्णयाविरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. तेथे निश्चितपणे न्याय मिळेल. हिंजवडी ग्रामपंचायतीने सादर केलेला अहवाल चुकीचा असल्याने त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. याबाबत तिन्ही सदस्यांना नक्कीच न्याय मिळेल.
-विशाल साखरे, माजी सरपंच, हिंजवडी ग्रामपंचायत