पुणे; पुढारी वृत्तसेवा : त्या रोज पहाटे तीन वाजता उठतात… हडपसर सेंटर येथून वृत्तपत्रे घेतल्यानंतर वडकी येथे घरोघरी कधी चालत जाऊन, तर कधी दुचाकीवर जाऊन वृत्तपत्रे वाटतात… गेल्या 35 वर्षांपासून म्हणजेच जवळपास तीन तपे न चुकता त्यांचा हा दिनक्रम सुरू असून, लिहिता-वाचताही न येणार्या मुक्ताबाई महादेव सुपेकर यांनी वृत्तपत्र विक्रीच्या क्षेत्रात भरारी घेतली आहे. व्यवसाय करताना अशिक्षित असल्याने अनेकांनी टोमणे मारले. पण, जिद्दीच्या जोरावर त्यांनी हा व्यवसाय सांभाळला अन् महिला वृत्तपत्र विक्रेता म्हणून मुक्ताबाईंनी एक ओळख निर्माण केली आहे. मेहनत आणि कष्टाचा हा प्रेरणादायी प्रवास त्यांनी उभारला आहे.
मुक्ताबाईंचे पती महादेव यांनी वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करताना सुरुवातीला सायकलवर फिरून वृत्तपत्रे घरोघरी वाटपाचे काम केले. वडकी येथील व्यवसायाची जबाबदारी मुक्ताबाईंनी सांभाळली. अशिक्षित असणार्या मुक्ताबाईंना हा व्यवसाय करताना खूप अडचणी आल्या. त्या मोठ्या मेहनतीने वृत्तपत्र विक्रीच्या व्यवसायात उतरल्या. सुरुवातीला त्यांचे पती आणि त्यांनी घरोघरी फिरून वृत्तपत्रे वाटप केली. बघता बघता व्यवसाय वाढला अन् मुक्ताबाईंवर मोठी जबाबदारी आली.
सुरुवातीला हिशेबही न येणार्या मुक्ताबाईंनी सर्व कामे शिकून घेतली. आजही त्या घरोघरी जाऊन वृत्तपत्रे वाटप करतात. वृत्तपत्रे जमा करणे, मुलांना पेपरलाइन काढून देणे, व्यवसायाचा हिशेब ठेवणे, बिल तयार करणे अशी विविध कामे त्या करीत आहेत. मुक्ताबाई या पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ हडपसर विभागाच्या सभासद आहेत. महिला दिनानिमित्त त्यांच्याशी संवाद साधला असता मुक्ताबाई म्हणाल्या की, माझे लग्न वयाच्या दहाव्या वर्षी झाले.
त्यामुळे शिक्षण घेता आले नाही आणि नकळत्या वयात संसाराची जबाबदारी माझ्या खांद्यावर आली. मी आणि माझे पती महादेव यांनी पुलगेटला शेंगदाणे-फुटाणे विकण्याचा व्यवसाय सुरू केला. हळूहळू येथे या व्यवसायासह आम्ही वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय सुरू केला आणि आताही आम्ही हा व्यवसाय करीत आहेत. माझ्या तिन्ही मुलींचे शिक्षण आणि त्यांचे लग्न या व्यवसायाच्या जोरावर करू शकले. आत्मविश्वास, मेहनत आणि जिद्दीने काम करीत गेले. माझ्या पती, कुटुंबीयांनी आणि वडकी येथील गावकर्यांनी खूप साथ दिली.