पुणे

लाखेवाडीमध्ये दरोडा; सव्वातीन लाखांचा ऐवज लुटला

अमृता चौगुले

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा: लाखेवाडी (ता. इंदापूर) गावात दरोडेखोरांनी एका कुटुंबाला चाकू, लोखंडी सळई, लोखंडी जंब्या, कोयते, सत्तूर आदीचा धाक दाखवत रोख रकमेसह तब्बल 3 लाख 33 हजार रुपये किमतीचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरोडेखोरांच्या मारहाणीत दोघे जखमी झाले आहेत. कालिंदा अशोक कुबडे (वय 39, रा. लाखेवाडी, ता. इंदापूर) यांच्या फिर्यादीवरून इंदापूर पोलिस ठाण्यात सहा दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुवारी (दि. 27) रात्री अंदाजे 22 ते 25 वयाचे सहा दरोडेखोर हातामध्ये चाकू, लोखंडी सळई, लोखंडी जंब्या, कोयते, सत्तूर, वाकड़ा कोयता अशा धारदार शस्त्रांसह हातात बॅटरी घेऊन फिर्यादी यांचे सासरे ज्ञानदेव सीमाराम कुबडे झोपलेल्या खोलीची आतील कडी काढून खोलीमध्ये घुसले.

ज्ञानदेव कुबडे यांच्या गळ्याभोवती लोखंडी जंब्या व डोक्यावर चाकू धरून धाक दाखवून खोलीमध्ये 3 ट्रंकमध्ये ठेवलेले 60 हजार रुपये रोख रक्कम, 1 लाख रुपये किमतीचे सव्वादोन तोळ्यांचे सोन्याचे गंठण, 50 हजार रुपये किमतीचे सव्वा तोळा वजनाचे सोन्याचे मिनी गंठण, 22 हजार रुपये किमतीची अर्ध्या तोळ्याची सोन्याची अंगठी, 16 हजार रुपये किमतीची चार ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 22 हजार रुपये किमतीची कानातील दोन फुले, आठ हजार रुपये सोन्याच्या दोन रिंगा, 50 हजार रुपये किमतीचे सव्वा तोळा वजनाचे सोन्याचे मणी व डोरले, चार हजार रुपये किमतीची नथ, दोन हजार रुपये किमतीचे पैंजण व एक हजार रुपये किमतीचे पायातील चांदीचे दागिने असा रोख रकमेसह 3 लाख 33 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला.

कालिंदा कुबडे यांच्या जाऊ झोपलेल्या खोलीच्या दरवाजास जोरात धक्का देऊन तो उघडला. दरोडेखोरांना पाहून त्यांनी आरडाओरडा केला. त्याच वेळी त्यातील दोघांनी त्यांच्या तोंडावर जोरात बुक्क्या मारून त्यांना जखमी केले. यासोबत घरातील इतर लोकांना हत्यारांचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी यांच्या मुलाच्या पायावर सळई मारली. याच वेळी अशोक कुबडे हे कोयता घेऊन आल्याचे पाहून दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. गुन्ह्याचा तपास इंदापूर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक प्रशांत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनवे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT