पुणे

वाणेवाडीत साडेतीन एकर ऊस जळून खाक

अमृता चौगुले

सोमेश्वरनगर; पुढारी वृत्तसेवा: शेतातून जाणार्‍या वीजवाहक तारांच्या घर्षणाने लागलेल्या आगीत वाणेवाडी (ता. बारामती) येथील साडेतीन एकर ऊस जळाला. यामध्ये शेतकर्‍यांचे जवळपास अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. याशिवाय शेतातील ठिबक सिंचन संच जळून गेला. सोमेश्वर कारखान्याला हा ऊस चालू हंगामात गाळपास येणार होता. सोमेश्वरचे संचालक ऋषिकेश गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देत नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. कारखान्याने जळालेला ऊस गाळपास नेला असला तरीही त्यातून कारखाना नियमाप्रमाणे बिलात कपात करणार आहे.

सभासद बाळकृष्ण भोसले, अक्षय भोसले, विलास भोसले, बेबी बापूराव जगताप, सुरेखा रामदास संकपाळ या सर्व सभासदांचा
मिळून 3.5 एकर ऊस आगीत जळाला. शेतातून जाणार्‍या वीजवाहक तारांना झोळ पडले आहेत तर काही ठिकाणी तारा थेट हातालाच येतात. मोठे नुकसान टाळण्यासाठी महावितरणने प्रयत्न करणे गरजेचे आहे. उसाच्या पिकातून शेतकर्‍यांना ठोस उत्पन्न मिळते, त्यामुळे शेतकरी उसाला जिवापाड जपत असतो. महावितरणकडून जळीत उसाला फारशी नुकसान भरपाई मिळत नाही. यासाठीही वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न होणे गरजेचे आहे.

SCROLL FOR NEXT