पुणे

महिलेला उचलून नेण्याची धमकी; फुरसुंगीच्या तिरंगा चौकातील प्रकार

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : विवाहित महिलेच्या कार्यालयाखाली येऊन 'तू मला महिन्यातून दोन ते तीन वेळा भेट नाही, तर मी तुला रोजच्या येण्या-जाण्याच्या रस्त्यातून उचलून नेईन. तुझ्या मुलाला खल्लास करेन,' अशी धमकी देणार्‍या एकावर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष चंद्रकांत काळभोर याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत एका 32 वर्षीय विवाहित महिलेने फिर्याद दिली आहे. आरोपी पीडित महिलेच्या ओळखीचा आहे. ती पतीच्या निधनानंतर तो काम करीत असलेल्या ठिकाणी नोकरी करते.

जुन्या ओळखीतून काळभोर याने महिलेला 'तू माझ्यासोबत प्रेम करणार नसशील, तर मी तुझ्या घरी येऊन नातेवाइकांना सांगेन व तुझी बदनामी करेल,' अशी धमकी दिली. फिर्यादीला जबरदस्तीने मिठी मारून लगट करण्याचा प्रयत्न करू लागला. तसेच, फिर्यादीच्या कानाखाली मारून तिला शिवीगाळ केली. हा सर्व प्रकार 2018 ते 28 डिसेंबर 2022 दरम्यान घडला. या प्रकरणी काळभोर याला ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिस उपनिरीक्षक उमरे यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT