पिता-पुत्राला ठार मारण्याची धमकी  pudhari
पुणे

Crime News: पिस्तुलाने पिता-पुत्राला ठार मारण्याची धमकी; माजी सैनिकाचे कृत्य

Fursungi News: फुरसुंगी पोलिसांनी आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून माजी सैनिकाला अटक केली

पुढारी वृत्तसेवा

पुणे : चेष्टा-मस्करीतून झालेल्या वादात माजी सैनिकाने शेजारी राहणाऱ्या पिता-पुत्राला पिस्तुलाने गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून माजी सैनिकाला अटक केली आहे. मनोज लक्ष्मण शेजवळ (वय 44, रा. वलवा वस्ती) असे माजी सैनिकाचे नाव आहे. याबाबत दत्तात्रय जयवंत फडके (वय 55) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार रविवारी (दि.25) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास वलवा वस्ती अन्नपूर्ण आश्रम शाळेजवळ वडकी परिसरात घडला आहे. शेजवळ याच्याकडे शस्त्र परवाना आहे. पोलिसांनी त्याच्याकडील पिस्तूल जप्त केले आहे. (Pune News Update)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजवळ हा सैन्य दलातून निवृत्त झाला आहे. फिर्यादी फडके आणि तो एकमेकांचे शेजारी आहेत. 25 मे रोजी दुपारी दीडच्या सुमारास मित्राच्या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी जेजुरीला गेले होते. तेथे शेजवळदेखील आला होता. त्यांच्यात चेष्टा-मस्करीतून वाद झाले. त्यानंतर सर्वजण आपआपल्या घरी आले होते.

मनोज शेजवळ हा सैन्य दलातून निवृत्त झाला आहे. त्याने पिस्तुलाच्या धाकाने दोघांना धमकावले असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी शेजवळला अटक केली आहे. त्याच्याकडील पिस्तूलदेखील जप्त केले आहे.
मंगल मोढवे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, फुरसुंगी पोलिस ठाणे

दरम्यान, फडके आणि त्यांचा मुलगा प्रणिल हे त्यांच्या घरी होते. त्या वेळी शेजवळ हा घरी आला. त्याने फडके यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण करत घरात प्रवेश केला. त्या वेळी फडके यांनी शेजवळला काय झाले, असे विचारले असता, तो म्हणाला, ‘तू माझा जेजुरीत सगळ्यांसमोर अपमान केलास. माझी इज्जत घालवलीस. तू येथे बाहेरून जगण्यासाठी आला आहेस. तू येथे कसा राहतो हेच पाहतो. तुला आणि तुझ्या पोराला दोन दिवसात मारून टाकतो.’ फडके यांनी शेजवळ याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यानंतरदेखील तो शिवीगाळ करून त्यांना मारहाण करत होता.

फडके यांचा मुलगा प्रणिल याने हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. त्यालादेखील शेजवळ याने शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने स्वतःच्या दुचाकीच्या डिक्कीतून पिस्तूल काढून लोड केले. त्यानंतर ते फडके यांच्यावर रोखून ‘तुम्हा दोघांना गोळ्या घालून मारून टाकीन, आजच्या आज तुम्ही गाव सोडून जायचे. नाही तर दोन दिवसांत तुम्हा दोघांना ठार मारून टाकीन,’ असे धमकावल्याचे फिर्यादीत म्हटले. हा प्रकार घटल्यानंतर फडके यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दिली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT