पुणे; पुढारी वृत्तसेवा: फातिमानगरातून जाणार्या मोठ्या कालव्यात घाण टाकल्याने हजारो माशांचा तडफडून मृत्यू झाला आहे. मात्र, याची कुणीही दखल न घेतल्याने नागरिकांनी त्याचे फोटो फेसबुकवर व्हायरल करून प्रशासनाला हा प्रकार थांबविण्याची विनंती केली आहे.
ही घटना शनिवारची असून, येथील रहिवासी डॉ. अजय सोनवले यांना हा प्रकार लक्षात आला. ते सायंकाळी फिरायला निघाले असता घरामागे असलेल्या मोठ्या कालव्यात शेकडो मासे तडफडून मृत झाल्याचे लक्षात आले. त्यांनी जवळ जाऊन त्याचे फोटो व व्हिडीओ घेतले. तेव्हा लक्षात आले की कुणीतरी त्या ठिकाणी कुजलेले निर्माल्य टाकल्याने माशांना विषबाधा झाल्याने ते तडफडून मरत आहेत.
आमच्या भागात असा प्रकार नेमहीच होतो. कालव्याच्या काठावर विसर्जन घाट बांधल्याने असे प्रकार नेहमीच होतात. या आधी आम्ही पोलिसात तक्रार केली होती. मात्र, त्याचे पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे याची तक्रार आता राष्ट्रीय हरित लवादाकडे करणार आहे.
– डॉ. अजय सोनवले, रहिवासी, फातिमानगर