राजगुरुनगर: खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील भीमाशंकर अभयारण्यालगत असलेल्या भागातील शेकडो गावातील हजारो एकर शेती जंगली जनावरांच्या त्रासामुळे पडकी ठेवण्याची वेळ शेतकर्यांंवर आली आहे. पवनचक्यांच्या आवाजामुळे बहुतेक सर्व जंगली जनावरे रानात व शेतकर्यांंच्या शेतात येण्याचे प्रमाण वाढले असून, जोमात आलेले शिवार जंगली जनावरांची टोळी काही मिनिटांत, एका रात्रीत उद्ध्वस्त करत आहेत.
यामुळेच पोत्यांनी होणारी कडधान्य पेरण्याच या भागातील शेतकर्यांनी बंद केले आहे. शेतातील विहिरीला पाणी असताना बागायत शेती सोडा घरी खाण्यापुरते केलेले कांदा, लसूण, बटाटा व इतर पिकेही ही जनावरे नष्ट करत आहेत.
खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात बहुतेक सर्व भागात पारंपरिक भात शेती केली जाते. खरीप हंगामात प्रत्येक शेतकरी व संपूर्ण शिवारात भात पीक घेतले जाते. यामुळे जंगली जनावरांचा फारसा उपद्रव होत नाही. परंतु गेले काही वर्षांत भात रोपे काही ठिकाणी जंगली जनावरे नष्ट करू लागली आहेत.
परंतु भात पीक निघाल्यानंतर या भागात अत्यंत पौष्टिक व चविष्ट असा काळा वाटाणा, बिनापाण्यावर येणारी गावरान मसूर, पावटा, हुलगे असे अनेक प्रकारची पारंपरिक कडधान्य पिके घेतली जात होती. परंतु आता जंगली डुक्कर, सांबर, फार मोठ्या प्रमाणात मोर, ससे, भेकर आणि वानर यांच्या टोळ्याच्या टोळ्या येऊन ही रब्बी हंगामातील पिके नष्ट, उद्ध्वस्त करत आहेत. यामुळेच गेल्या काही वर्षांत परिसरातील हजारो एकर सुपीक शेती पडीक आहे.
आंबोली गावात दरावस्तीत चांभरदरा येथे आमची चार पाच एकर शेती आहे. पाच-दहा वर्षांपूर्वी आम्ही याच शेतात भात काढून झाल्यावर काळा वाटाणा, मसुरा, पावटा पिक घ्यायचो. पाच-दहा पोती कडधान्य या शेतात होत होते. परंतु गेल्या काही वर्षांत हाता-तोंडाशी आलेले पीक आपल्या डोळ्यासमोर ही जंगली जनावरे नष्ट करतात. तीन वर्षांपूर्वी रानडुक्कर व भेकराची टोळीने तीन एकरमधील कांदा, पोकळ्याची, मेथीची भाजी पूर्णपणे खाऊन, लोळूण नष्ट करून टाकली. यामुळे गेले दोन वर्षांपासून सर्व शेती आमची पडीक पडली आहे.पुष्पा रामचंद्र शिंदे, शेतकरी, आंबोली.
आमचे बहुतेक शेत घरालगतच आहे. आठ-दहा एकर शेती व मुबलक पाणी आहे. जंगली जनावरांचा प्रचंड त्रास, उपद्रव असल्याने केवळ एखाद्या एकरमध्ये किमान घरी खाण्यासाठी यंदा कांदे, लसूण व काही पालेभाज्या लावल्या होत्या. पण दोन दिवसापूर्वीच सांबरांची भलीमोठी टोळी आली व एका रात्रीत दीड ते दोन महिन्यांचे कांदे, लसूण पीक संपूर्ण उद्ध्वस्त केले. यामुळे हक्काची सुपीक शेती असून, माझ्यासारखे हजारो शेतकऱ्यांना रेशनिंगचे धान्य, विकतचे धान्य खाण्याची वेळ आली आहे. वनविभागाकडे तक्रार केली की नुकसानभरपाई मिळण्यासाठी घालावे लागणारे हेलपाटे व प्रत्यक्ष भरपाईची तुटपुंजी रक्कम लक्षात घेता कोणीही तक्रार करत नाही.- विश्वनाथ सुतार, बागायतदार शेतकरी, आडेगाव