पिंपरी : महापालिकेने असंख्य अधिकारी व कर्मचारी एकाच विभागात अनेक वर्षांपासून ठाण मांडून आहेत. त्यामुळे त्यांची त्या विभागात मक्तेदारी निर्माण होते. त्यातून कामे व फाईली अडविण्याचा प्रकार होतो. त्यासंदर्भात पालिकेचे आयुक्त व सामान्य प्रशासन विभागाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याची दखल घेऊन आयुक्त शेखर सिंह यांनी अशा अधिकारी व कर्मचार्यांची यादी सर्व विभागप्रमुखांकडून मागविली आहे. आता, बदली अटल असल्याने अशा अधिकारी व कर्मचार्यांचे धाबे दणाणले आहेत.
एका विभागात सलग तीन वर्षे काम केलेल्या अधिकारी व कर्मचार्यांची दुसर्या विभागात बदली केली जाते. हा महापालिका नियम आहे. मात्र, पालिकेतील अ, ब, क आणि ड वर्गातील असंख्य अधिकारी व कर्मचार्यांची तीन वर्षांनंतरही बदली होत नसल्याचे चित्र आहे. एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या या अधिकारी व कर्मचार्यांबाबत आयुक्तांकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अशा अधिकारी व कर्मचार्यांमुळे कामकाजात शिथिलता येते. जाणीवपूर्वक कामे अडविणे, फाईली रोखणे असे प्रकार केले जातात. तसेच, ठेकेदारांची अडवणूक केली जाते. यासह अनेक प्रकारांच्या तक्रारी पालिका प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत.
त्याची दखल घेऊन सामान्य प्रशासन विभागाने बदलीस पात्र असलेल्या अधिकारी व कर्मचार्यांची यादी सर्व विभागांकडून मागविली आहे. मे 2023 पर्यंत बदलीस पात्र असलेल्यांची नाव 28 फेबु्रवारीपर्यंत सादर करण्याचे सूचना विभागप्रमुखांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकाच ठिकाणी ठाण मांडून असलेल्या कर्मचार्यांचे धाबे दणाणले आहेत.
पात्र अधिकारी, कर्मचार्यांची दुसर्या विभागात बदली होणार
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेतील अधिकारी व कर्मचार्यांच्या तीन वर्षांनंतर दुसर्या विभागात बदली करणे आवश्यक आहे. त्या धोरणानुसार महापालिकेच्या सर्व विभागांतील अधिकारी व कर्मचार्यांची माहिती 28 फेब्रुवारीपर्यंत मागविण्यात आली आहे. प्राप्त झालेल्या यादीनुसार आयुक्त संबंधित अधिकारी व कर्मचार्यांची दुसर्या विभागात बदली करण्याचा निर्णय एप्रिल व मे महिन्यात घेतील, असे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.