पुणे

पुणे : यंदा पुरुषोत्तम करंडक कोराच! प्रथम क्रमांकाचा मानकरी नाही

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुरुषोत्तम करंडक स्पर्धा म्हणजे महाविद्यालयीन जीवनातील रंगमंचीय आविष्कारांचे सोनेरी पान. मात्र, गेल्या 57 वर्षांच्या स्पर्धेच्या इतिहासात यंदा प्रथमच एकाही महाविद्यालयाला पुरुषोत्तम करंडक जाहीर झाला नाही. एकही महाविद्यालयाची एकांकिका करंडकास पात्र ठरली नसल्याने या करंडकावर कोणत्याच महाविद्यालयाला आपले नाव कोरता आले नाही. त्यामुळे केवळ पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्यूटर टेक्नॉलॉजी या महाविद्यालयाच्या 'कलिगमन' या एकांकिकेला सांघिक क्रमांक देण्यात आला आहे.

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती च्या 'भू भू' एकांकिकेला दुसर्‍या क्रमांकाचा हरी विनायक करंडक, तर मॉडर्न कला शास्त्र आणि वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय शिवाजीनगर या महाविद्यालयाच्या 'गाभारा' या एकांकिकेस तिसरा क्रमांकाचा संजीव करंडक जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी (दि.17) आणि रविवारी (दि.18) भरत नाट्य मंदिरमध्ये पार पडली.

प्रत्येक संघाने मोठ्या मेहनतीने अंतिम फेरीत एकांकिकांचे सादरीकरण केले होते. भरत नाट्य मंदिरात रविवारी रात्री निकाल जाहीर होणार असल्याने सर्व महाविद्यालयीन संघांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मात्र, अंतिम फेरीत दाखल झालेल्या नऊ संघांपैकी एकाही संघाची एकांकिका करंडकास पात्र नसल्याचा शेरा परीक्षकांनी दिल्याने एकाही संघाला पुरुषोत्तम करंडकावर आपले नाव कोरता आले नाही. यातच यंदा सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेचे पारितोषिक एकाही संघाला जाहीर झाले नाही.

तसेच, सर्वोत्कृष्ट वैयक्तिक अभिनय नैपुण्यासाठी देण्यात येणारा नटवर्य केशवराव दाते करंडक पात्रतेचा एकही कलाकार नसल्यामुळे केवळ 1500 रुपयांचे रोख पारितोषिक सनी पवार (तुळजाराम चतुरचंद महा.बारामती) याला देण्यात आले. त्याचप्रमाणे सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय नैपुण्यासाठी देण्यात येणारा पुरुषोत्तम जोशी व यशवंत स्वराभिनय करंडकही कोणाला जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे तन्वी कांबळे (कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय) हिला 'नझमा' या भूमिकेसाठी केवळ 1500 रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

या व्यतिरिक्त नटश्रेष्ठ गणपतराव बोडस करंडक पारितोषिक एकाही दिग्दर्शकाला देण्यात आलेले नाही. त्यामुळे दिग्दर्शिका प्रतीक्षा शेलार (मॉडर्न कला शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालय) हिला 'गाभारा'या एकांकिकेसाठी बक्षीस मिळाले. अभिनय नैपुण्यासाठी मयूरी निकम आणि ऋतिक रास्ते यांना पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेच्या अंतिम फेरीचे परीक्षक म्हणून परेश मोकाशी, हिमांशू स्मार्त व पौर्णिमा मनोहर यांनी काम पाहिले.

स्पर्धेतील इतर पारितोषिके
सर्वोत्कृष्ट आयोजित संघ : गोखले इंस्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स इकॉनॉमिक्स (क्षणार्थ)
सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लेखक : गौरी डांगे, पेमराज सारडा महाविद्यालय, नगर (बिनरंगाची गोष्ट)
सर्वोत्कृष्ट विद्यार्थी प्रायोगिक लेखक : अनुश्री देशमुख, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज (स्पर्श, नॉट रिचेबल)
उत्तेजनार्थ विद्यार्थी लेखिका : तन्वी कांबळे व वैभवी पानसे, कमिन्स अभियांत्रिकी (चाराणे)

पुरुषोत्तम करंडकासाठी एकही पात्र एकांकिका नाही असे परीक्षकांचे मत झाले. त्यामुळे करंडक देऊ नका, सांघिक पारितोषिक द्या, असे त्यांनी सांगितले. स्पर्धेचा हा नियमही आहे की जर पात्र एकांकिका नसेल, तर करंडक देण्यात येऊ नये. स्पर्धेच्या 57 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे.

                                              – राजेंद्र ठाकूरदेसाई, महाराष्ट्रीय कलोपासक संस्था

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT