पुणे

यंदा मान्सून 106 % बरसणार

Arun Patil

पुणे/नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : यावर्षीचा मान्सून देशात दमदार तसेच मनसोक्त बरसणार असल्याचा अंदाज आहे. एक जून ते 30 सप्टेंबर या चार महिन्यांत देशात सरासरीपेक्षा जास्त 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, जगभरातील स्थिती मोसमी पावसाला पोषक आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा जास्त 106 टक्के मोसमी पावसाचा अंदाज आहे. प्रशांत महासागरातील 'अल-निनो'ची स्थिती सध्या सक्रिय आहे. जूनच्या सुरुवातीपर्यंत अल-निनो निष्क्रिय स्थितीत जाईल आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अल-निनो सक्रिय होईल. हिंद महासागर द्विध्रुविता (इंडियन ओशन डायपोल, आयओडी) सध्या निष्क्रिय आहे. जूनच्या सुरुवातीस आयओडी सक्रिय होईल. युरोशियातील (युरोप आणि आशिया) बर्फाच्छादित क्षेत्र मार्च-एप्रिलमध्ये सरासरीपेक्षा कमी राहिले. ही सर्व स्थिती नैऋत्य मोसमी पावसासाठी पोषक आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्रात चांगला पाऊस…

मध्य भारत, दक्षिण भारत, उत्तर भारतात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज असला, तरीही जम्मू-काश्मीर, लडाख, ईशान्य भारत आणि ओडिशा, छत्तीसगड, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या काही भागांत सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचा सुधारित अंदाज जाहीर केला जाईल. त्यावेळी महिनानिहाय पावसाची शक्यता जाहीर केली जाईल, असेही महापात्रा म्हणाले. मध्य भारतात चांगला पाऊस पडणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही चांगल्या पावसाचा अंदाज आहे.

ला-निना काळात सरासरीपेक्षा जास्त पाऊस

ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ला-निना परिस्थिती सक्रिय होत आहे. त्यामुळे या काळात आजवर सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याचे निरीक्षण आहे. अपवाद वगळता ला-निना काळात नैर्ऋत्य मोसमी पाऊस वेळेत केरळमध्ये दाखल होऊन, निर्धारित वेळेत देशभरात पोहचतो, असेही महापात्रा यांनी सांगितले.

महाराष्ट्रात धो धो पाऊस….

'आयएमडी'ने जाहीर केलेल्या पर्जन्यमान संभाव्यता नकाशाने सूचित केले आहे की, महाराष्ट्रातील बहुतांश भागात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. अंदाज नमुन्यांमधून स्पष्ट सिग्नल उपलब्ध नसल्यामुळे विभागाला विदर्भात पावसाची संभाव्यता ओळखता आली नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT