पुणे

डॉ. आंबेडकर यांचे विचारधन मराठीतही ! सामाजिक, आर्थिक समस्यांच्या विश्लेषणाच्या अनुवादाला गती

अमृता चौगुले

सुवर्णा चव्हाण

पुणे : देशाच्या सामाजिक, आर्थिक समस्यांचे दाहक विश्लेषण आपल्या व्यासंगी लेखणीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक खंडांच्या ग्रंथांतून केले. मात्र, बहुतांश इंग्रजीमधून असलेले हे विचारधन आता मराठी भाषेत येण्यास सुरुवात झाली असून, लवकरच त्यांचे सर्व लिखाण मराठीजनांना वाचायला मिळणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंग्रजीतील 22 खंडांना जगभरातून प्रतिसाद आहे. डॉ. आंबेडकर यांचे मौखिक आणि लिखित साहित्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीने इंग्रजीतून खंडांच्या रूपात प्रकाशित केले आहे.

त्यातील खंड 6 आणि 13 हे मराठीतून भाषांतरित झाले असून, आता टप्प्याटप्प्याने संपूर्ण उर्वरित खंड मराठीत आणण्याचे काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून इंग्रजीतील 1 आणि 2 खंड यंदाच्या वर्षी मराठीतून येणार असून, त्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले लेख, त्यांनी लिहिलेले ग्रंथ यांचा समावेश असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आतापर्यंत जवळपास 22 खंड प्रकाशित झाले आहेत. आता 23 या नवीन खंडाचे काम देखील अंतिम टप्प्यात आहे.

डॉ. आंबेडकर यांच्या खंडात जीवनकार्याचा वेध घेणार्‍या छायाचित्रांवर आधारित खंड आहेत. तसेच त्यांनी वित्त या विषयावर लिहिलेले लेख, जाती व्यवस्थेचे निर्मूलन, महाराष्ट्र एक भाषिक प्रांत आदी विषयांवर खंड आधारलेले आहेत. शुक्रवारी साजर्‍या होणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दै. 'पुढारी'ने याबद्दल माहिती जाणून घेतली. समितीचे सचिव डॉ. प्रदीप आगलावे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले ग्रंथ, त्यांची भाषणे आदींचा समावेश खंडांमध्ये आहे. डॉ. आंबेडकर यांच्या इंग्रजी साहित्याला जगभरातून मागणी आहे. आतापर्यंत 22 खंड इंग्रजीतून प्रकाशित झाले आहेत. आता लवकरच इंग्रजीतील 23 वा खंड प्रकाशित होणार आहे.

साहित्य ऑडिओ अन् ई-बुक्स
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याची भुरळ आजही कायम असून, त्यांची 1920 ते 1956 या काळातील भाषणे, त्यांनी लिहिलेले लेख, ग्रंथ अन् त्यांच्यावर लिहिण्यात आलेले चरित्र ग्रंथ हे आता ऑडिओ बुक आणि ई-बुक स्वरूपात उपलब्ध आहेत, तरुण वाचकांचा त्याला प्रतिसाद आहे. ऑडिओ बुक संस्थेच्या रश्मी नायगावकर म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 21 महत्त्वाची भाषणे आणि निवडक लेख हे ऑडिओ बुक स्वरूपात आम्ही आणले आहेत. 'बुकगंगा'चे विवेक कुलकर्णी म्हणाले, ई-बुक स्वरूपातही डॉ. आंबेडकर यांच्या साहित्याला चांगला प्रतिसाद आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथ आणि त्यांच्या लेखांचा समावेश खंडांमध्ये आहे. त्यांचे लेखन खूप समृद्ध असून, इंग्रजीत असलेले त्यांचे खंड प्रत्येकालाच वाचता येतील असे शक्य नसते. त्यामुळे मराठीतील खंड तळागाळातील लोकांना वाचता येतील. वैचारिक क्रांती नक्कीच घडेल.
                         – जयदेव गायकवाड, डॉ. आंबेडकर यांच्या साहित्याचे अभ्यासक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT