पुणे

…त्यांच्याकडूनच शिवसेना संपविण्याचा प्रयत्न ; सचिन अहिर यांची भाजप आणि शिंदे गटावर टीका

अमृता चौगुले

लोणावळा : पुढारी वृत्तसेवा : शिवसेना वाचविण्यासाठी बाहेर पडलो सांगणार्‍यांकडूनच शिवसेना संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा कोणाच्या सांगण्यावरून सुरू आहे हे आता वेगळे सांगायची गरज राहिलेली नाही, अशा शब्दाने शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांनी शिंदे गट व भाजपवर निशाणा साधला.  पुणे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक लोणावळ्यात पार पडली. या वेळी अहिर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सचिन अहिर म्हणाले, 'हा गेम प्लॅन आहे, मुंबई मनपा निवडणुकीपुरता शिंदे गटाचा वापर होणार हे त्यांना नंतर समजेल. सध्या महाराष्ट्रात गाडी शिंदे गटाच्या हातात असली, तरी चालक कोणी दुसराच आहे, हे सर्वांना समजले आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेचा विजय निश्चित आहे. शिवसेना चिन्ह गोठविल्याने शिंदे गटातदेखील नाराजी आहे. पण हे तात्पुरते आहे,' असे सांगत सारवासारव केली जात असल्याचे अहिर म्हणाले.

निवडणूक आयोगाने आमच्या दोन्ही गटाच्या बाजू ऐकून घेऊन निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी कागदपत्रं न पडताळता चार तासांत निर्णय घेतला. आमचे 10 लाख नोंदणीकृत सभासद असल्याचे आम्ही सांगताच, मागील आठवड्यात दिल्लीत 1.25 लाख नोंदणी शिंदे गटाची झाली असल्याची बातमी आलेली असताना लगेच चार आठ दिवसांत ही संख्या 7 लाख कशी झाली, याची छाननी होणे गरजेचे आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध वेळप्रसंगी न्यायालयात जाण्याची आमची तयारी आहे. मात्र, निवडणूक आयोग आमची बाजू ऐकून घेऊन न्याय देईल हा आम्हाला विश्वास आहे, असे अहिर यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यात व लोणावळा शहरात शिवसेना बांधणी करण्यासाठी कार्यकर्ता बैठका सुरू असून, संघटना वाढीसाठी काही नवीन जिल्हा संघटक नियुक्त करण्यात आले आहे. नोव्हेंबर महिन्यापासून संघटकांच्या आढावा बैठकांनंतर मी स्वतः लोकसभा मतदारसंघाचे दौरे करणार असल्याचे अहिर यांनी सांगितले.

..अन्यथा पुन्हा पक्ष बदलावा लागेल
शिवसेनेचे आजी व माजी खासदार शिंदे गटात गेले याकडे लक्ष वेधले असता, अहिर म्हणाले, त्यांच्या मतदार संघात भाजपने तयारी सुरू केली आहे. केंद्रीय मंर्त्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. भाजपने या जागा शिंदे गटाला सोडण्यात येणार असल्याचे जाहीर करावे, नाही तर आजी माजींना पुन्हा पक्ष बदलावा लागेल, अथवा भाजपचे चिन्ह घेऊन लढावे लागेल, अशी परिस्थिती आहे. लोणावळा शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब फाटक व पदाधिकारी यांनी शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख पदाधिकारी बैठकीचे नियोजन करण्यात आले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT