बारामती: तालुक्यातील सोरटेवाडी गावच्या हद्दीत रोहित गाडेकर (वय २७, रा. मासाळवस्ती, सोरटेवाडी) या सावकाराच्या खून प्रकरणी फरार असलेला तिसरा आरोपी अमोल माने याला वडगाव निंबाळकर पोलिसांनी कर्नाटकातील निडगुंडी येथून ताब्यात घेत अटक केली. या प्रकरणात दोन आरोपींना चाकण पोलिसांनी यापूर्वीच अटक करत त्यांचा ताबा वडगाव निंबाळकर पोलिसांकडे दिला आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, वडगावचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे यांनी याबाबतची माहिती दिली. रविवारी (दि. ६) सोरटेवाडी गावच्या हद्दीत कुलकर्णी चारी ते शेंडकरवाडी रस्त्यावर गोरख खेंद्रे यांच्या पोल्ट्री फार्मजवळ रोहित याचा मृतदेह अंगावर वार झालेल्या अवस्थेत पोलिसांना मिळून आला होता. या प्रकरणात अविनाश सुरेश गाडेकर यांनी फिर्याद दाखल केली होती. घटनेनंतर आरोपी पसार झाले होते.
दरम्यान चाकण पोलिसांनी या प्रकरणात फरार असलेल्या सागर माने (रा. सोरटेवाडी, ता. बारामती) व विक्रम काकासो मासाळ (रा. मासाळवाडी, ता. बारामती) यांना चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बहुळ (ता. खेड, जि. पुणे) गावच्या डोंगरातून ताब्यात घेत अटक केली होती. त्यांचा ताबा वडगाव निंबाळकर पोलिसांना देणण्यात आला. अमोल वसंत माने हा तिसरा आरोपी फरार होता. त्याला कर्नाटकातील निडगुंडी येथून गोपनीय माहितीच्या आधारे ताब्यात घेत अटक करण्यात आली.
रोहित गाडेकर याने माने यांना व्याजाने पैसे दिले होते. पैशासाठी तो सतत तगादा लावत होता, तसेच जादा व्याज घेवून त्रास देत होता. त्यातून आरोपींसोबत त्याचा सुरवातीला किरकोळ वाद झाला होता. व्याजाच्या त्रासाला कंटाळून या तिघांनी एकत्र येत त्याला पैसे देतो असे सांगत बोलावून घेत त्याचा खून केल्याची कबुली आरोपींनी तपासात पोलिसांना दिली.
ही कामगिरी पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर अधिक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे, उपनिरीक्षक राहूल साबळे, अंमलदार अनिल खेडकर, पोपट नाळे, ह्दयनाथ देवकर, महेश पन्हाळे, सुर्यकांत कुलकर्णी, भाऊसाहेब मारकड, रमेश नागटिळक, अमोल भोसले, सागर देशमाने, स्थानिक गुन्हे शाखेचे बाळासाहेब कारंडे, सुनील बालगुडे, दिपक वारुळे, सागर चौधरी, कुंडलिक कडवळे, आबा जाधव, सुरज धोत्रे, विलास ओमासे, नीलेश जाधव, नागनाथ परगे, भानुदास सरक, धनंजय भोसले, राजू मोमीन आदींनी केली.