माळशिरस : पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्याच्या पूर्वभागामध्ये चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घरात झोपले तर बाहेरच्या वस्तू चोरीला जातात व उन्हाळ्याचे दिवस असल्याने गरम आहे म्हणून बाहेर झोपले तर घरात चोरी होत आहे अशी स्थिती आहे. माळशिरस या ठिकाणी मागील आठवड्यात चोरट्यांनी एकाच रात्रीत आठ ठिकाणी घरफोडी करून तब्बल नऊ तोळे सोने व एक लाख रोख रक्कम गायब केली होती.
या घटनेचा तपास जेजुरी पोलिस करत आहे. तोच शुक्रवारी (दि.24) भरदुपारी माळशिरस येथील रहिवासी महादेव मराठे यांची माळशिरस मुख्य चौक या ठिकाणाहून चक 12 एव 7553 काळ्या रंगाची स्प्लेडर गाडीदेखील चोरीला गेली आहे. त्यातच पुन्हा एकदा (दि.25) पहाटेच्या सुमारास माळशिरस येथील रहिवासी शमशुद्दीन मेहबूब शेख यांची घरासमोर लावलेली एमएच04 इएक्स5386 या क्रमांकाच्या लाल रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीवरसुद्धा चोरट्यानी डल्ला मारत गाडी घेऊन पोबरा केला.
सध्या पुरंदर तालुक्याच्या पूर्वभागामध्ये यात्रांना सुरुवात होत असल्याने घरातील विविध कामे उरकण्यावर लोकांचा भर आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेक जण घराला कडी लावून बाहेर झोपत आहेत आणि चोरटे याच संधीचा फायदा घेत चोरी करत आहेत.
जेजुरी पोलिस ठाण्याच्या वतीने गस्त तसेच भुलेश्वर घाटात लवकरच चेकपोस्ट करण्यात येणार असून, गावात होणार्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी व पोलिसांच्या सहकार्यासाठी गावातील ग्राम सुरक्षा दल पुन्हा कार्यरत करणे गरजेचे आहे. यासाठी तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा.
-सौ.पूजा यादव,