पुणे : राष्ट्रकुट राजवटीच्या काळापासून पेशवाईपर्यंत पुणे शहराच्या विविध भागात शिवमंदिरांचे निर्माण झाले. डोंगराच्या कड्यापासून भूगर्भात तयार झालेली मंदिरे आजही बांधकाम शैलीतला उत्कृष्ट नमुना ठरतात. स्वयंभू पासून नर्मदेतून आणून स्थापन केलेल्या शिवलिंगाच्या विधीवत पूजेपर्यंत शिवलिंगाचे वेगळेपण दिसून येते. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पुढारीने शहरातील घेतलेल्या महत्त्वांच्या मंदिरांची पाहणी केली व मंदिरांचा वेगळेपणा जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
पेशवाईतील हे पहिले मंदिर असून इ. स. 1734 ते 1736 दरम्यान पेशव्यांचे अध्यात्मिक गुरू वेदमूर्ती शिवरामभट चित्राव यांनी सुमारे एक लक्ष खर्च करून बांधले. पुणे शहरातील हे सर्वात मोठे मंदिर असून पेशवेकालीन शिल्प कृतीचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिराच्या शिखरावर उत्कृष्ट नक्षीकाम असून मंदिराला नऊ कळस आहेत. मंदिरातील ओंकारेश्वराचे शिवलिंग भव्य, प्रमाणबध्द आहे. नर्मदेवरून ते आणण्यात आले. ऐतिहासिक कागदपत्रांत बाण थोर, उत्तम लक्षणयुक्त, नर्मदेवरून आणीला असे नमूद करण्यात आले आहे. शिवलिंगाची शाळुंखा पार्थिव लिंगा प्रमाणे तांबड्या रंगाची आहे. मंदिराच्या मधल्या कळसा दरम्यान असलेल्या मोकळ्या जागेला तालीम असे म्हटले जाते. स्वातंत्र्य लढ्यात येथे गुप्त बैठका होत असत. महर्षि व्यास, हाताची घडी घातलेले आणि डोक्यावर पगडी असलेले दत्तगुरू, दोन सिंह आणि चार साधूंची शिल्प कळसामध्ये आहेत.
राष्ट्रकुट राजवटीच्या काळात इ. स. 8 व्या शतकाच्या सुमारास एकाच मोठ्या खडकात खोदकाम करून निर्माण केलेले लेणे म्हणून पाताळेश्वर लेणीची नोंद आहे. कातळाच्या भव्य चौकोनी स्तंभांनी पेललेला गोलाकारातील मंडप या वास्तुच्या सुंदरतेचे आणि त्या काळातील वास्तुकलेचे दर्शन घडवितो. लेणीमध्ये प्रवेश केल्यानंत समोर तीन गर्भगृहे दिसून येतात. बाहेर नंदी आहे. मधल्या गर्भगृहात स्वयंभू शिवलिंग बाजूच्या गर्भगृहामध्ये गणपती आणि तिसर्या गर्भगृहामध्ये पार्वतीची मूर्ती आहे. शिवलिंगाच्या या गर्भगृहाच्या दरवाजानजीक आकर्षक नक्षीकाम आहे. येथील भिंतींवर शिल्पे आहेत. तर प्रदक्षिणा मार्गात राम-लक्ष्मण-सीता आणि समोर मारुतीची मुर्ती आहे. प्रदक्षिणा मारून पुन्हा समोर येईपर्यंत लेणीची भव्यता नजरेत भरते. पाताळेश्वर लेणी हे भारत सरकाराने राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे.
येरवडा परिसरात चारशे फूट उंच डोंगरावर असलेले तारकेश्वर मंदिर. पांडवकालीन असलेले हे मंदिर एका पाषाणात कोरण्यात आले आहे. 250 पायर्या चढून तसेच वाहनाने थेट मंदिराच्या पायरीपर्यंत जाता येते. पुण्यात दोन स्वयंभू शिवलिंग असलेल्या मंदिरापैकी हे एक मंदिर आहे. मंदिरात दक्षिणमुखी हनुमान, गणपती, काळभैरवनाथ, रेणुकामाता दगडामध्ये कोरलेल्या आहेत. मंदिरामध्ये असलेला काळभैरवनाथ हा निवडी, येरवडा व संगमवाडी भागातील ग्रामस्थांचे ग्रामदैवत आहे.
पाषाण येथील सोमेश्वरवाडीतील श्री सोमेश्वर महादेव मंदिर हे पुण्यातील प्राचीन मंदिरांपैकी एक असणारे शिवालय म्हणून ओळखले जाते. राम नदीच्या काठावर बांधलेल्या या मंदिराचा जीर्णोधार केल्यावर जिजाऊ बालशिवबांसह या मंदिराला भेट देत असत, असे जुने जाणकार सांगतात. मंदिराच्या आवारात असलेल्या तसेच चारही बाजूंनी शिल्पे कोरलेल्या एका वीराच्या स्मृतिशिळेवरून (वीरगळ) या मंदिराची प्राचीनता इसवी सन बाराव्या-तेराव्या शतकापर्यंत नेते. मंदिराचे छत आणि भिंती अष्टदिक्पाल, त्यांची वाहने, काही लढाईचे प्रसंग अशी चित्रे काढून सुशोभित केलेल्या आहेत. मंदिर परिसरात गणपती, भैरवनाथ, हनुमान पद्मावती मंदिरे आढळतात. मंदिर परिसरात अनेक लहान मंदिरे आणि दीपमाळ आहेत. तसेच, 12 ज्योतिर्लिंग मंदिरांच्या प्रतिकृतीही परिसरात उभारण्यात आल्या आहेत.
राष्ट्रकुट राजवटीच्या काळात खोदकाम करून निर्माण केलेली लेणी म्हणजे श्री बाणेश्वर मंदिर असे इतिहासतज्ञ सांगतात. तर, ग्रामस्थांच्या मते ती पांडवकालीन असल्याचे सांगण्यात येते. शिवलिंगाला बाण हा शब्द वापरतात तसेच बाणेश्वर नावावरून गावाला बाणेर हे नाव पडल्याचे सांगण्यात येते. बाणेर गावातील तुकाई टेकडीच्या पायथ्याशी हे मंदिर आहे. 40 ते 50 पायर्या चढून गेल्यानंतर हे मंदिर लागते. लेणीमध्ये जिवंत पाण्याचे कुंड आहे. पुर्वी मंदिरात स्वयंभू शिवलिंग होते. मात्र, हजारो वर्षांपूर्वीची असल्याने त्याची झीज झाल्यानंतर विधीवत पुजा करून नर्मदेवरून आलेल्या काळ्या रंगाच्या शिवलिंगाची विधीवत पूजा करून स्थापना करण्यात आली.
स्वारगेटपासून साधारणत: दहा किलोमीटर अंतरावर धायरीत धारेश्वर मंदिर आहे. श्री धारेश्वर मंदिर हे शिवकालीन असून, या मंदिराचा जिर्णोद्धार 1993 ला पूर्ण होऊन या मंदिराचा कलशारोहण करण्यात आले. श्री रायकर कूलभूषण जैतुजी महाराज यांच्या भक्तीने श्री धारेश्वर धायरी येथे स्थापित झाले आहे. श्री धायरेश्वर शिवलिंग हे स्वयंभू आहे. हे मंदिर ऐतिहासिक असल्याने महाराष्ट्र शासनाने तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केले आहे. धारेश्वर मंदिरामध्ये प्रत्येक वर्षी चैत्र कृष्ण चतुर्थीला उत्सव, माघ पोर्णिमा, भाते तेरस, घुगरे तेरस, त्रिपुरारी पौर्णिमा-दीपोत्सव हे कार्यक्रम खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरे केले जातात.
शिवाजीनगर गावठाण (भांबुर्डे) येथील 5 प्रमुख मंदिरापैकी श्री वृध्देश्वर सिध्देश्वर मंदिर देवस्थान असून त्यास मुठा नदीचा किनारा लाभला आहे. हे मंदिर शिवकालीन असल्याचे सांगण्यात येते. मंदिराचे बांधकाम दगडी, शिखर बिरांचे व चुनेगच्ची आहे. शिखराच्या भोवती सज्जा आहे. कोरिव काम केलेल्या दगडीचा आधार आहे. लाकडी सभामंडप, कौलारू छप्पर गाभार्याच्या दरवाजावर कोरिव काम केलेले आहे. आत पायर्या असून खाली गेल्यावर स्वयंभु शिवलिंगाचे दर्शन होते. मंदिरासमोर दिपमाळ, नंदी असुन परिसर देखणा आहे. सवाई माधवराव पेशवे यांच्या दप्तरी पुण्यातील पुरातन मंदिरामध्ये श्री वृध्देश्वर सिध्देश्वर मंदिराची नोंद आहे.
राजा दिनकर केळकर संग्रहालात देखील महादेवाची सुंदर लाकडी मुर्ती असून यात भगवान शंकर संसारी माणसाप्रमाणे घरात बसलेले दाखविले आहे. एका बाजूला पार्वती तर दुसर्या बाजूला मांडीवर बाल गणेश बसलेला आहे. कपाळावर त्रिपुंड असून गुंडाळलेल्या जटांच्या वरून नागफणा बाहेर आलेला आहे. गळ्यात रुद्राक्षमाळा व खाली पिवळ्या रंगाचे पितांबर आहे. गृहास्थाश्रमी माणसाप्रमाणे प्रसन्न भाव असलेली भगवान शंकराची मुर्ती लक्षवेधी असून कोकणातील सावंतवाडी येथील असून ती 19 व्या शतकातील आहे. तसेच, तेथे भगवान शंकरांचे अतिशय जुने चित्र असून व्याघ्रांबर घातलेले भगवान शिव एका भक्ताशी बोलताना रंगीत चित्र आहे. याचा कालखंड मात्र उपलब्ध नाही.