पुणे

मुठा उजव्या कालव्याजागी सहापदरी रस्ताच होणार

अमृता चौगुले

शिवाजी शिंदे : 

पुणे : खडकवासला धरणापासून ते फुरसुंगीपर्यंतच्या मुठा उजव्या कालव्याच्या जागेवर किमान सहापदरी रस्ता करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस जलसंपदा विभागाच्या कार्यकारी समितीने केली असल्याने ही जागा बिल्डरांच्या घशात जाण्याचा धोका टळला आहे. या रस्त्यापैकी काही पदर हे सार्वजनिक वाहतुकीसाठी राखून ठेवण्यात येणार असून त्याच्या डोक्यावरून मेट्रोही नेता येणार आहे. त्यामुळे चौतीस किलोमीटर लांबीच्या या बहुपदरी रस्त्यामुळे सिंहगड रस्ता, सोलापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी सुटेल.

खडकवासला ते फुरसुंगीदरम्यान वेगळ्या मार्गाने भूमिगत कालवा करण्याची योजना मार्गी लागल्याने अस्तित्त्वात असलेल्या उजव्या कालव्याची जागा उपलब्ध होणार होती. या जागेवर अनेक वर्षांपासून काही बांधकाम व्यावसायिकांचा डोळा होता आणि त्याला राजकीय वरदहस्तही मिळाला होता. मात्र कालव्याच्या जागेचा व्यावसायिक वापर न करता पुणेकरांच्या हितासाठी तेथे रस्ताच करण्याची मागणी दै. पुढारीने उचलून धरली होती. त्याचाही परिणाम झाल्याचे मानले जात आहे. कालव्याच्या या जागेचा वापर नेमका कसा करता येईल, याबाबत जलसंपदा विभागाच्या कार्यकारी समितीने अहवाल सादर केला असून त्यात बहुपदरी रस्त्याची शिफारस करण्यात आली आहे. या अहवालातील सूचनेला मान्यता देणारा ठराव आता करण्यात येईल आणि त्यानंतर त्याच्या अंमलबजावणीचे टप्पे ठरविण्यात
येणार आहेत.

कालव्याची सध्याची रूंदी किती ?
खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान कमी अधिक रूंदीची जागा जलसंपदाकडे असून त्याची किमान रूंदी 75 मीटर तर कमाल रूंदी 350 मीटर आहे. त्यामुळे किमान सहापदरी रस्ता शक्य होणार आहे.

कालव्यावरील रस्त्याचा फायदा काय ?
सिंहगड आणि सोलापूर या दोन्ही रस्त्यांवर गेल्या काही वर्षांपासून होणारी वाहतुकीची प्रचंड कोंडी सुटण्यास मदत होईल.
सार्वजनिक वाहतुकीसाठी स्वतंत्र पदर मिळणार असल्याने सार्वजनिक वाहतूक मजबूत होणार

भूमिगत वाहिनीचा प्रकल्प कसा ?
खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान 25 किलोमीटरची वाहिनी प्रकल्पाचा खर्च दीड हजार कोटी
बाष्पीभवन आणि गळतीने पाणी वाया जाण्याचे प्रमाण शून्यावर येऊन वर्षाला अडीच अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्याची बचत

खडकवासला साखळी प्रकल्पावरील नवीन उजवा मुठा कालव्यावर वाहतुकीसाठी रस्ताच होणार आहे. हा रस्ता किमान सहा पदरी असणार आहे. याबरोबरच मेट्रो सुध्दा होऊ शकते. यासाठी काही वर्षाचा कालावधी लागेल.
           – अतुल कपोले , कार्यकारी संचालक, कृष्णा खोरे विकास महामंडळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT