नीलम गोर्‍हे  Pudhari News Network
पुणे

राज्यात यापूर्वी अनेक गृहमंत्री झाले, त्यांच्या काळात देखील अत्याचार होत होते : नीलम गोर्‍हे

पुढारी वृत्तसेवा

राज्यात यापूर्वी अनेक गृहमंत्री झाले, त्यांच्या काळात देखील अत्याचार होत होते. लहान मुलांवरील अत्याचाराबाबत शाळा, शिक्षकांनी जागृती करावी. शृंगारिक गाणी, अश्लीलतेचे उदात्तीकरण झाले असून, ते होऊ नये, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी व्यक्त केले.

सोमवारी त्या बारामतीत पत्रकारांशी बोलत होत्या. डॉ. गोर्‍हे यांनी या वेळी बारामतीत होणार्‍या एकनाथ भवनची पाहणी केल्याचे सांगत राज्यातील 79 मतदारसंघांत शिवसेनेचे 19 नेते सध्या दौरा करून पाहणी करत आहेत. माझ्याकडे पुरंदर, खेड, चाकण, भोर, मुळशीची जबाबदारी असून, महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर, नोव्हेंबरचा निधी देणार आहोत. आम्ही निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून या योजना केल्या, असे आरोप केले जातात. मात्र, सरकार आल्यावर आनंदाचा शिधा योजना राबविली. लेक लाडकी योजनेत 22 वर्षे पूर्ण होईपर्यंत पाच लाख रुपये टप्प्याने देत आहोत. महिलांवर होणार्‍या अत्याचारावर आम्ही दक्षता समिती स्थापन केली आहे. गुन्हे रोखण्यासाठी जपानच्या धर्तीवर तंत्रज्ञानाचा वापर केला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अत्याचार झाल्यावर हळहळ व्यक्त करणे योग्य नाही. यापूर्वी देखील अनेक गृहमंत्री झाले. त्यांच्या काळात अत्याचार होत होते. अपराध रोखण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा. शाळा आणि महाविद्यालयांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची गरज आहे. स्व:मदत गट तयार करावे लागणार आहेत. महाविद्यालयात अँटिरॅगिंग कमिटी असावी. परिवहन, शिक्षण, पोलिस, समाजकल्याण, बाल विभागाने रिपोर्ट द्यावेत, आम्ही त्या शाळांवर कारवाई करू, असेही गोर्‍हे म्हणाल्या. या वेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र जेवरे उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT