भीमाशंकर : पुढारी वृत्तसेवा : आदिवासी भागात चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्याने श्री क्षेत्र भीमाशंकरकडे जाणार्या पोखरी घाटात दरड पडल्याचे प्रकार सुरू आहेत. यासह कुशिरे ते फलोदे परिसरात दोन ठिकाणी दरड कोसळली. पावसाचे प्रमाण वाढल्यास मोठ्या प्रमाणावर दरड रस्त्यावर येऊन रस्ता बंद अथवा दुर्घटना घडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. या भागात गेले 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पोखरी घाटात मागील वर्षी याच ठिकाणी दरड कोसळली होती. त्याच ठिकाणी पुन्हा दरड कोसळली असून, रस्त्यावर दगडगोटे आणि मातीचा राडारोडा येत आहे, तर कुशिरे बुद्रुकजवळ मोरी तुटलेला भाग खचू लागल्याने रस्ता बंद होण्याची दाट शक्यता आहे.
सध्या आदिवासी भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने नदी, नाले-ओढे, तुडुंब भरून वाहत आहेत. यामुळे रस्ते खचण्याची शक्यता असते. परिणामी घाटातून प्रवास करताना भाविक व पर्यटकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. प्रशासनाकडूनदेखील काळजी घेत प्रवास करावा, असे आवाहन घोडेगावचे सहायक पोलिस निरीक्षक किरण भालेकर यांनी केले आहे. भीमाशंकरला येणार्या पर्यटक व भाविकांसह स्थानिकांनीदेखील पोखरी घाटात व फलोदे-कुशिरे परिसरात प्रवेश करताना सावधगिरी बाळगत प्रवास करावा. मुसळधार पावसामुळे डोंगर-टेकड्यांचा भाग कोसळत असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रवासी व स्थानिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.