पुणे : बक्षीसपत्राद्वारे शेतजमीन, सदनिकेचे हस्तांतरण करताना पती-पत्नी, मुलगा-मुलगी, नातू-नात, मुलाची विधवा पत्नी यांच्यासाठी केवळ 200 रुपये आकारणी केली जाते. मात्र, यामध्ये भाऊ-बहीण या नात्याचा राज्य सरकारने अजूनही समावेश केलेला नाही. या प्रकारच्या बक्षीसपत्रासाठी जादा मुद्रांक शुल्क आकारणी करण्यात येत आहे. याबाबत राज्यातील अनेक नागरिकांनी सवलत देण्याची मागणी राज्य शासनाकडे केली आहे.
महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 मधील कलम 34 मध्ये बक्षीसपत्र करण्याची तरतूद आहे. त्यामध्ये 2015 साली नवीन तरतूद समावेश करून नवरा-बायको, मुलगा-मुलगी, नातू-नात, मुलाची विधवा पत्नी यांच्या नावे शेतजमीन, रहिवासी क्षेत्रासाठी दोनशे रुपये शुल्क आकारण्यात येतात. मात्र, या तरतुदीमध्ये बहीण-भाऊ हे नाते रक्ताचे समाविष्ट नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून बहीण-भाऊ या रक्ताच्या नात्याचाही समावेश करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र, राज्य शासनाने अद्याप याबाबत कोणतीही अंमलबजावणी केलेली नाही.
बक्षीसपत्रात ‘भाऊ-बहीण’ या नात्यासाठी 200 रुपये मुद्रांक शुल्क आकारण्याची सवलत नाही. त्याकरिता कायद्यात दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. हा निर्णय राज्य शासनाने घेतल्यास त्यानुसार कार्यवाही केली जाईल.संतोष हिंगाणे, मुद्रांक जिल्हाधिकारी, पुणे शहर
भाऊ-बहीण हे रक्ताचे नाते आहे. या नात्यामध्ये भावनिक हितसंबंध विचारात घेऊन महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात भाऊ-बहीण यांच्यातील बक्षीसपत्रासाठी मुद्रांक शुल्क दोनशे रुपये आकारण्याची सवलत मिळण्यासाठी आवश्यक तरतूद करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. सामाजिक हित विचारात घेऊन या मागणीप्रमाणे अधिनियमात योग्य ती दुरुस्ती करण्यासाठी आदेश द्यावेत, असे नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.