Baramati News: काटेवाडीत पवार फार्मवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आयोजित पाडवा कार्यक्रमाबाबत माहिती नाही, असे खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या. निवडणूक आयोगाने पिपाणीसाठी ‘ट्रम्पेट’ हा शब्दप्रयोग करण्याचे आता मान्य केल्याने लोकसभेवेळचा संभ्रम दूर होईल. लोकसभेला त्यामुळे मोठा फटका आम्हाला बसला होता, असे त्या म्हणाल्या.
बारामतीत पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, ट्रम्पेट चिन्हामुळे लोकसभेला फटका बसल्याने ते चिन्ह काढून टाकावे, अशी आमची मागणी होती. त्यासाठी डेटासुद्धा सादर केला होता. परंतु निवडणूक आयोगाने ती फेटाळली. आता पिपाणीखाली ट्रम्पेट लिहिण्याचे मान्य केले. त्यामुळे फूल ना फुलाची पाकळी आम्हाला मिळाली.
पण आता घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करते. निवडणूक आयोगाला दाखवून दिलं होतं आणि निवडणूक पारदर्शकपणे व्हावी यासाठी आम्ही ती मागणी केली होती. परंतु तसे घडले नाही. अर्थात, आत्ता जो निर्णय आला आहे त्याचे मी स्वागत करते, असे त्या म्हणाल्या.
सुळे पुढे म्हणाल्या, आमचा दिवाळीचा पाडवा हा गोविंदबागेत साजरा होतो. आज हजारो लोक गोविंदबागेत येऊन भेटून गेले. उद्यादेखील येथील हा एक दिवस असतो, ज्याची आम्ही आतुरतेने लोकांची वाट पाहत असतो. वर्षातील हा सगळ्यात महत्त्वाचा आनंद दिवस असतो, असे त्या म्हणाल्या. दुसरा पाडवा कार्यक्रम होण्याबद्दल माहिती नाही, असे त्या म्हणाल्या.