बारामती: एकेकाळी जानेवारी महिना सुरू झाला की लगेचच टँकर सुरू करा, अशी मागणी बारामती तालुक्याच्या जिरायती भागातून होत असायची. परंतु, गेल्या 4 वर्षांपासून हे चित्र बदलले आहे. गतवर्षाप्रमाणे यंदाही तालुक्यात पाणीपातळी चांगली टिकून राहिली आहे. परिणामी, एप्रिल महिना आठवड्यावर येऊनही अद्यापपर्यंत तालुक्यातील एकाही गावाने पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी केली नसल्याची माहिती गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल यांनी दिली.
बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील पाणीटंचाईचे चित्र हळूहळू बदलत असून, शेतकर्यांसाठी हे दिलासादायक चित्र आहे. सुपे तलावात असलेला समाधानकारक पाणीसाठा, लोणी भापकर येथील पाणीपुरवठा योजना आणि जानाई शिरसाई पाणीपुरवठा योजनेतून स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. यापूर्वी जानेवारी, फेब्रुवारीतच पाण्याची तीव्र टंचाई जाणवायची. गावोगावचे सरपंच, ग्रामसेवक तहसील कार्यालय आणि पंचायत समितीत येऊन टँकरची मागणी करायचे. मात्र, हे चित्र आता काही प्रमाणात बदलले आहे.
गतवर्षी झालेला समाधानकारक पाऊस, ओढे-नाले, विहिरी, कूपनलिकांची पाणीपातळी टिकून आहे. त्यामुळे यंदाही तालुका टँकरमुक्त राहील, असे दिलासादायक चित्र आहे. जिल्ह्यात सर्वाधिक टँकर लागणारा तालुका अशी बारामतीची ओळख होती. परंतु, तालुक्यात झालेली जलसंधारणाची कामे, गावाने केलेले सामूहिक प्रयत्न आदींमुळे ही ओळख पुसण्यात यश मिळाले आहे. यापूर्वी दर उन्हाळ्यात 20 ते 35 गावांतील सुमारे 50 हजार नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असे.
टँकरची शंभरी बारामती तालुक्यात पार होत होती. पंचायत समिती आणि शासकीय स्तरावर, खासगी, शासकीय तसेच काही उद्योजक टँकर पुरवीत होते. कायम दुष्काळी भाग म्हणून तालुक्यातील सुमारे 30 ते 35 गावे कायमच चर्चेत असत. मात्र, गेल्या 4 वर्षांपासून ही स्थिती बदलली आहे. या भागातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. गावे टँकरमुक्त झाल्याने ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी धावपळ आणि त्यातून होणारे वाद थांबले आहेत.