येरवडा: पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यातच दुसर्या बाजूला येरवड्यातील राष्ट्रीय स्मारक आगाखान पॅलेसमध्ये सुरक्षेचा अभाव पाहायला मिळत आहे. संपूर्ण परिसरात एकही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याचे दिसून येत आहे. दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण? अशी विचारणा नागरिक करीत आहेत.
जगाने आज एआयचा स्वीकार केला आहे. प्रत्येक ठिकाणी पोलिस प्रशासनाला आज घडलेल्या गुन्ह्यात सर्वांत महत्त्वाचा पुरावा हा सीसीटीव्हीच्या माध्यमातून मिळत असतो, असे प्रत्येक ठिकाणी दिसून येत आहे. हा संपूर्ण परिसर 16 एकरांमध्ये पसरला आहे. (Latest Pune News)
गांधीजींना 1942 ते 1944 मध्ये नजरकैदेत याच वास्तूमध्ये ठेवण्यात आले होते. याच काळात कस्तुरबा गांधी तसेच गांधीजींचे स्वीय सहायक महादेवभाई देसाई यांचे निधन झाले. याच वास्तूच्या एका बाजूला त्यांच्या समाधी बांधण्यात आल्या आहेत. अशा राष्ट्रीय संपत्तीबाबत सुरक्षेचा अभाव असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
ही वास्तू पाहण्यासाठी दररोज साधारण 100 हून अधिक पर्यटक येतात. यात दोन ते तीन पर्यटक विदेशी पाहुणे तसेच शनिवारी, रविवारी या ठिकाणी 500 हून अधिक पर्यटक येतात. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
संपूर्ण परिसरात आता एकही कॅमेरा नाही. मागील वर्षी तसेच याही वर्षी शासनाला याविषयी पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. लवकरच कॅमेरे बसविले जातील.- गजानन मंडावरे, वरिष्ठ संवर्धन अधिकारी
मागील काळात याविषयी प्रशाकीय अधिकार्यांना सांगण्यात आले होते. यावर काहीच कार्यवाही झाली नाही. आता पुन्हा याविषयी जिल्हाधिकारी, पुणे पोलिस आयुक्त तसेच महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे कळविण्यात येणार आहे.- बापूसाहेब पठारे, आमदार