पुणे

पाण्याची टाकी तर आहे पण जलवाहिनीचा पत्ताच नाही

अमृता चौगुले

शिक्रापूर : पुढारी वृत्तसेवा :  पाबळ आणि केंदूर (ता. शिरूर) या दोन गावांसाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल 59 कोटी रुपयांची योजना राबविण्यात येत आहे. परंतु पाबळ गावच्या पाणीपुरवठ्यासाठी या योजनेमध्ये नवीन पाण्याच्या टाक्यावर घरापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी वितरण लाइनच नसल्याचे उघड झाले आहे. सन 1995 मधील जुन्याच टाक्या या योजनेत वापरण्याचा घाट घातला गेला आहे. जलजीवन मिशनच्या या भोंगळ कारभारामुळे या योजनेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ही योजना कागदावर तयार होत असताना अधिकारी व गावातील पदाधिकारी कशात मग्न होते, असा सवाल नागरिकांमधून चर्चलिा जात आहे. पाबळ आणि केंदूर या दोन गावांसाठी 59 कोटी रुपयांची जलजीवन मिशन योजनेच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे.

खेड तालुक्यातील चिंचोशी गावातील चासकमान कालव्याच्या उद्भवावरून ही योजना राबविण्यात येत आहे. पाबळ गावापासून तब्बल 20 किलोमीटर अंतरावरून हे पाणी आणण्यात येणार आहे. एवढी मोठी रक्कम खर्च करत असताना पाबळ गावासाठी योजनेमध्ये ना पाण्याची टाकी ना घरापर्यंत वितरिका लाइन अशी अवस्था आहे. यामुळे योजनेचे पाणी मिळणार कसे हा प्रश्न उभा राहिला आहे.
पाबळमध्ये सन 1995 मध्ये पहिल्यांदा पाणी योजना राबविली गेली. त्यानंतर पाबळ गावाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. तसेच सध्याच्या टाकीचे आयुष्यमानदेखील संपत आले. नवीन योजनेतील पुढील 25 वर्षांचा व सध्याच्या वाढलेल्या संख्येचा विचार करता मोठ्या क्षमतेची नव्याने पाण्याची टाकी बांधण्याची गरज आहे. गावातील रस्ते काँक्रीट व डांबरीकरण झाल्यामुळे वितरिका लाइनदेखील नव्याने टाकण्याची गरज आहे. या बाबींचा गंभीरपणे विचार न करता जलजीवनची योजना रेटण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे नव्याने राबविण्यात असलेली ही योजना अपयशी ठरणार असून नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोचणार नसल्याचे चित्र आहे.

सध्या 28 वर्षांपूर्वीची पाणी योजना अस्तित्वात
तब्बल 28 वर्षांपूर्वी सन 1995- 96 मध्ये जर्मन अर्थसाह्य योजनेमधून पाबळसाठी पाणी योजना राबविण्यात आली आहे. यामध्ये 1 लाख 17 हजार लीटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. या योजनेची पाण्याची टाकी व वितरण लाइन नवीन योजनेत वापरण्याचा घाट घातला गेला आहे. परंतु सध्याच्या पाण्याच्या टाकीची क्षमता कमी असल्यामुळे गावाला दोन दिवसांनी पाणीपुरवठा करावा लागतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT