पुण्यातील पद्मावती देवीचे मंदिर हे पेशवेकाळापासून प्रसिद्ध आहे. या देवीचा उल्लेख ‘स्वामी’ आणि ‘राऊ’ या कादंबर्यांमध्ये आढळतो. पुणे-सातारा रस्त्यावर स्वारगेटपासून तीन किलोमीटर अंतरावर पद्मावती देवीचे मंदिर आहे. मंदिराचा परिसर मोठा असून, नवरात्रोत्सवात वैविध्यपूर्ण धार्मिक कार्यक्रम होतात आणि त्यात भाविकही आनंदाने सहभागी होतात.
या मंदिरातील मूळ स्थान कोकणातील आहे. या मंदिराचे पुजारी बिबवे यांची अकरावी पिढी मंदिरातील व्यवस्था पाहत आहे. मंदिराचे जुन्या काळातील पुजारी बिबवे यांचे पूर्वज तांदळाचे व्यापारी होते. कोकणातून तांदूळ आणून तो विकणे आणि शेती असा त्यांचा व्यवसाय होता. बिबवे यांची देवीवर नितांत श्रद्धा होती. एके दिवशी शेतात काम करत असताना बैलाच्या खुराला लागून देवी स्वयंभू प्रकट झाली, अशी अख्यायिका सांगितली जाते. पूर्वीच्या देवीचा आकार सध्याच्या देवीपेक्षा वेगळा होता. त्या वेळी देवीचा आकार लहान आणि गोल होता.
आता देवीचा आकार वाढत चालल्याचे बोलले जाते. देवीच्या डोक्यावर असलेला मुकुट हा उत्तरेला असून, मंदिरासमोरच पाच रक्षक देवीच्या रक्षणासाठी उभे आहेत. त्याच्याच बाजूला देवीचे वाहन सिंह आहे आणि बाजूलाच मोठे होमकुंड आहे. मंदिराच्या परिसरात महादेव, श्री गणपती, मारुती यांची मंदिरे आहेत. आता मंदिरात भाविकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मंदिराचा परिसर रमणीय आहे. मंदिराच्या जवळ तळे आहे. या तळ्याची देखभाल बिबवे कुटुंबीय करत होते. पण, काही वर्षांपूर्वी पुणे महापालिकेने येथे उद्यान तयार केले. त्यामधील तळ्यात पाच मंगळवार किंवा शुक्रवारी आंघोळ केल्यावर त्वचेचे आजार बरे होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. आज उद्यानाला अनेकजण भेट देत आहेत. हे मंदिर भाविकांसाठी श्रद्धास्थान आहे.
पद्मावती देवीचा नवरात्र आणि पौष महिन्यात उत्सव असतो. मोठी यात्रा पौष महिन्यात भरते. दर मंगळवारी आणि शुक्रवारी मंदिरात भाविकांची गर्दी असते. दसरा, चैत्र पंचमी आणि वैशाख अक्षय तृतीया महिन्याच्या यात्रेत भक्तिभावाने देवीचा छबिना नगारा वाजवत परिसरातून फिरवत आणतात. दसर्याच्या दिवशी पालखी बिबवेवाडी गावातून मंदिरात आणली जाते. सायंकाळी पुन्हा पालखी बिबवेवाडीला जाते. दसर्याच्या दिवशी रात्री देवीचे मंदिर बंद केल्यानंतर कोजागरी पौर्णिमेस मंदिर पुन्हा दर्शनासाठी उघडले जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात येत आहे. मंदिरात भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत.बिबवे कुटुंबीय, पद्मावती देवस्थान