पुणे

पुणे : कोलवडी गावात सात- बारामध्ये चक्क खाडाखोड

अमृता चौगुले

सिताराम लांडगे : 

लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील महसूल विभागात गावातील तलाठी कार्यालयात तलाठ्यांनीच अनधिकृतरित्या नेमलेल्या खासगी कर्मचाऱ्यांचा उच्छाद सुरू आहे. पुर्व हवेलीत तलाठी कार्यालयातील शासकीय अभिलेखात त्यांचा मोठा हस्तक्षेप सुरू आहे. तलाठी या खासगी कर्मचाऱ्यांशिवाय कामच करु शकत नसल्याची विदारक परिस्थिती आहे. कोलवडी गावामधील एका सात-बारात तर चक्क खाडाखोड केल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. हवेलीचे नवनियुक्त तहसीलदार किरण सुरवसे या गंभीर प्रकरणात काय कारवाई करणार याकडे संपूर्ण हवेली तालुक्याचे लक्ष लागले आहे

हवेली तालुका महसूल विभागात अत्यंत मलाईदार म्हणून ओळखला जात आहे.हवेलीतील प्रत्येक गावात कोट्यावधी रूपयांचे जमिनीचे मोठ्या प्रमाणात व्यवहार सुरू असतात अनेक गावात वादातील तसेच निर्वेघ जमिनींसाठीही दररोज तलाठी कार्यालयात जावे लागते, परंतु तालुक्यातील प्रत्येक गावात तलाठ्यांनी खासगी कर्मचाऱ्यांची नेमणुक केलेली आहे. तलाठ्यांना या खासगी कर्मचाऱ्यांशिवाय काम करताच येत नाही सर्व कामकाज हे या खासगी कर्मचाऱ्यांच्या हातात गेले आहे.या खासगी कर्मचाऱ्यांकडूनच आर्थिक फायदा होत असल्याने ते म्हणतील ती पुर्व दिशा अशी स्थिती आहे.

हवेली तालुक्यातील सर्वात मोठा आर्थिक लाभ कृषी जमिनीतील 'प्लाॅटींग'च्या बेकायदा नोंदीत आहे व हे काम सुरक्षित करत असल्याने तलाठ्यांना या खासगी कर्मचाऱ्याशिवाय पर्याय नाही अशी स्थिती आह. खासगी कर्मचारी बिनधास्त विनापरवाना शासकीय अभिलेख हाताळत आहेत यांना तलाठ्यांची संमती असते. अभिलेख कार्यालयाबाहेर घेऊन जातात. यापेक्षा गंभीर बाब म्हणजे कोलवडी गावात तर एका शेतकऱ्याच्या सातबारावर तर चक्क खाडाखोड केल्याचा गंभीर प्रकार झाला आहे. तक्रार करु नये म्हणून त्या शेतकऱ्याचे रोज पाय धरले जात आहेत. या गंभीर प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो परंतु गाव कामगार तलाठी हे खंड चार मध्ये नमूद असलेले कार्य आणि कर्तव्य विसरले आहेत तर शासकीय अभिलेख जतन करणे हे तलाठ्यांचे कर्तव्य असताना खुलेआम शासकीय अभिलेख या खासगी कर्मचाऱ्यांच्या हातात दिले जातात असा गंभीर प्रकार हवेली तालुक्याच्या महसूल विभागात घडत आहे.

 तहसीलदार हे करतील का?

हवेली तालुक्याचे तहसीलदार या गंभीर प्रकरणात लक्ष देतील का तसेच खाजगी कर्मचारी शासकीय कार्यालयात नेमू नये असे शासन परिपत्रक क्रमांक संकिर्ण २०१३/प्र.क्र/३९६/ई१०तसेच जिल्हाधिकारी परिपत्रक पमट/कावी/७३३/२००३ तसेच हवेली तहसीलदार क्रमांक आस्था/कावी/३१२/२०१६ असताना याची अंमलबजावणी हवेली तालुक्यात महसूल विभागाकडून केली जात नाही याची अंमलबजावणी हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे करतील का हे तालुक्यात पहावयास मिळेल.

कोलवडी गावामधील सातबारामध्ये झालेल्या खाडाखोडीबाबत संबंधित तलाठ्यांकडुन अहवाल मागावुन घेऊन त्यानंतर योग्य ती कार्यवाही केली जाईल व तालुक्यात ज्या गावात असे खासगी कर्मचारी नेमले आहेत त्याची तपासणी केली जाईल.
                                                          -किरण सुरवसे, तहसीलदार,हवेली

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT