पुणे : कोरोना महामारीवर भारताने पूर्णपणे नियंत्रण मिळवले असून, देशाचा कोविड-19 चा डॅशबोर्ड शून्याच्या दिशेने जात आहे. कारण, 10 मार्च 2025 रोजी देशात केवळ सहा रुग्णांना कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्याची ताजी नोंद आहे. चार वर्षांत देशात 220 कोटी 68 लाख 94 हजार लोकांचे लसीकरण झाले. या महामारीत हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात एकही कोरोनाचा रुग्ण नाही.
देशातील कोरोनाचा पहिला रुग्ण पुणे शहरात 9 मार्च 2020 रोजी सापडला होता. त्यानंतर संपूर्ण देशात कोरोना महामारीला सुरुवात झाली.10 ते 12 मार्च दरम्यान पुन्हा पुणे आणि मुंबई शहरात काही रुग्ण विमानतळावर सापडले होते. त्या घटनेला यंदा पाच वर्षे पूर्ण होत आहेत. मार्च 2020 ते ऑक्टोबर 2022 पर्यंत दोन वर्षांत जगात, देशात अन् महाराष्ट्रात या महामारीने हाहाकार माजवला होता, मात्र भारताने आत्मनिर्भर होत देशातच लसीचे उत्पादन करीत जगातील अनेक देशांना लस दिली. त्या भयावह आठवणी आता वाचायलाही नको वाटतात, अशाच प्रतिक्रिया डॉक्टरांनी व्यक्त केल्या आहेत.
कोविड महामारीने महाराष्ट्रात सर्वाधिक धुमाकूळ घातला होता. मात्र गत सहा महिन्यांत एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे विभागीय स्तरासह राज्यातील कोविड-19 ची माहिती देणारे डॅशबोर्ड संकेतस्थळावरून हटविण्यात आले आहेत. सध्या फक्त केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाचा डॅशबोर्ड सक्रिय असून, त्यात ही ताजी माहिती दिली आहे.
कोविडची महामारी पूर्णतः आटोक्यात आली आहे. कारण शेवटचा विषाणू आला तो ओमिक्रॉन आहे, तो अत्यंत क्षीण आहे. त्याच्यापेक्षा ‘एन्फ्लुएन्झा’चे विषाणू प्रबळ आहे. देशात लोकांना होऊन गेलेला कोरोना, नंतर वेगाने झालेले लसीकरण यामुळे प्रतिकारशक्ती वाढली. त्यामुळे आता कोरोनाची लक्षणे आढळली, तरी रुग्ण दोन दिवसांत बरा होतो. त्याची वाटचाल शून्याकडे आहे, ही खूप सकारात्मक बाब आहे.डॉ. ईश्वर गिलाडा, विषाणूजन्य आजार तज्ज्ञ, मुंबई