कामशेत : पुढारी वृत्तसेवा : मावळ तालुक्यातील नाणे मावळ भागातील अनेक रस्त्यांची पावसाच्या पाण्यामुळे दाणादाण उडाली आहे. बर्याच रस्त्यांवर मोठमोठे खड्डे झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना रस्त्यावरून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्यांची डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. नाणे मावळ हा मावळ तालुक्यातील एक मोठा भाग आहे. सुमारे 60 ते 70 गावे आणि वाड्या वस्त्यांपर्यंत नाणे मावळ पसरला आहे. शिवाय शेतीव्यवसायाबरोबर कुक्कुटपालन छोटे छोटे व्यवसाय आहेत. तसेच नाणे मावळ हा पर्यटकांसाठी आकर्षण करणारा परिसर म्हणून ओळखला जातो.
या परिसरात कोंडेश्वर शिरोदा डॅम, उकसानजवळील निसर्गरम्य परिसर अशा विविधतेने नटलेला परिसर, जांभवलीपासून ते कामशेत, साधारण 25 कि.मी. उकसान ते कामशेत 18 कि.मी. साई, वाउंड ते कामशेत 12 कि.मी. खांडशी ते कामशेत 12 कि.मी. असा या भागात दळणवळणाचा मार्ग आहे. सतत लहान,मोठ्या गाड्यांची ये-जा चालू असते. साधारणपणे कामशेतपासून नाणे मावळ हा भाग 80 ते 100 कि.मी.चा रस्ता असून दरवर्षी ह्या रस्त्याची दुरवस्था होत असते. यातील काही रस्ते पीडब्लूडी, काही रस्ते पंचायत समिती बांधकाम विभागाकडे असतात. पण सद्यस्थितीत दोन्ही विभागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.
यामध्ये वडिवळे ते सांगिसे, कामशेत ते नाणे, साई वाउंड उकसान, उंबरवाडी, करंजगाव इत्यादी गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मोठ्या प्रमाणात दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला जातो. हा निधी खड्ड्यात जातो. या रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असतो. कारण रस्ते तयार करताना मोठ्या प्रमाणात टक्केवारीचा व्यवहार होत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे तयार होणारे रस्ते हे निकृष्ट दर्जाचे असतात.
पावसाळ्यात व शिवाय अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची चाळण होते. अशा रस्त्यावरून वाहने चालविणे अवघड झाले आहे. जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते. प्रसंगी छोटे छोटे अपघात होत असतात, पण एखाद्या वेळी मोठी दुर्घटना होऊन एखाद्याचा जीव जाऊ शकतो, यांस जबाबदार कोण, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
संबंधितांना नोटीस
कामशेत वडिवळे रस्ता संबंधित ठेकेदारास करण्यास सांगितले आहे. त्या संबंधितांना नोटीस बजावली आहे, अशी माहिती पंचायत समिती बांधकाम विभागाचे अधिकारी धनराज पाटील यांनी दिली. कामशेत ते नाणे गावाकडे जाणार्या रस्त्याची दुरुस्ती करण्याचे काम ठेकेदारास सांगितले आहे; पण सध्या पाऊस असल्याने काम थांबले आहे. पाऊस थांबताच रस्ते दुरुस्त करण्यात येतील.
-सुरेश पाठाडे, अधिकारी पीडब्लूडी अधिकारी