पुणे

पुणे : प्राचार्य गटासाठी आज मतदान ; अधिसभेच्या खुल्या प्रवर्गातील पाच जागांसाठी होणार ‘कांटे की टक्कर’

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या संस्थाचालक गटाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. तर प्राचार्य गटातील पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील उर्वरित पाच जागांसाठी रविवारी (दि.27) पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यात तीन ठिकाणी मतदान होणार आहे. यामध्ये 298 प्राचार्य मतदानाचा हक्क  बजावणार आहेत. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील पाच जागांसाठी 'कांटे की टक्कर' होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.  विद्यापीठाच्या अधिसभेत प्राचार्य गटाच्या एकूण दहा जागा आहेत. त्यातील खुला प्रवर्ग वगळता आरक्षित प्रवर्गातील पाच जागांपैकी चार जागा बिनविरोध झाल्या आहेत.

तर एस.टी. प्रवर्गाची जागा रिक्त राहिली आहे. एस.सी. प्रवर्गातून डॉ. देविदास वायदंडे, ओबीसी प्रवर्गातून डॉ. वैभव दीक्षित, एन.टी. प्रवर्गातून डॉ. गजानन खराटे, तर महिला प्रवर्गातून डॉ. क्रांती देशमुख यांची बिनविरोध निवड झाली आहे. खुल्या प्रवर्गातील उर्वरित पाच जागांसाठी रविवारी मतदान होत आहे. पाच जागांसाठी नऊ उमेदवार रिंगणात आहेत. संबंधित जागांसाठी मतमोजणी 29 नोव्हेंबरला विद्यापीठात केली जाणार आहे.

अधिसभेमधील संस्था-चालकांच्या गटातील सहा जागांपैकी पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर एका जागेवर अनुसूचित जमाती या प्रवर्गातील एकही उमेदवार उपलब्ध होवू शकला नाही. त्यामुळे अधिसभेतील संस्थाचालक गटाची निवडणूक देखील संपल्यात जमा आहे. संस्थाचालकांच्या गटातून डॉ. राजेंद्र विखे-पाटील, डॉ.अपूर्व हिरे, प्रा. विनायक आंबेकर, अशोक सावंत यांची आणि महिला गटात डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांचा बिनविरोध उमेदवारांत समावेश आहे. पदवीधर गटासाठी झालेल्या निवडणुकीत दहापैकी तब्बल नऊ जांगावर विजय मिळवत विद्यापीठ विकास मंचने आपला दबदबा सिध्द केला आहे. त्यामुळे  प्राचार्य गटातील निवडणूक म्हणजे केवळ औपचारिकता राहिल्याचे चित्र आहे.

SCROLL FOR NEXT