पुणे : पुढारी वृत्तसेवा : मुंबई-बंगळुरू महामार्गावरील किवळेनजीक होर्डिंग कोसळून पाच जणांना आपला जीव गमवावा लागला. जुना बाजार येथे काही वर्षांपूर्वी होर्डिंगसाठीचा लोखंडी सांगाडा कोसळून रिक्षाचालकासह दोघांचा मृत्यू झाला होता. अशाप्रकारे केवळ मानवी चुकांची शिक्षा या निष्पाप नागरिकांना मिळाली आहे. यासंदर्भात शहर आणि उपनगरांतील सद्य:स्थितीची पाहणी दै. 'पुढारी'कडून करण्यात आली. यामध्ये होर्डिंग आणि फ्लेक्स यांचे पेव फुटल्याचे दिसून आले. यावर कोणतीही कारवाई होत नाही, त्यामुळे सध्यातरी 'होर्डिंग, फ्लेक्स उभारले भारी; यमराज हा उभा शेजारी!' हेच कटू वास्तव स्वीकारावे लागणार आहे.
शहरातील महापालिका हद्दीत अधिकृत 2485, तर अनधिकृत 2629 होर्डिंग आहेत. सर्वाधिक अनधिकृत होर्डिंग उपनगर आणि नव्याने समाविष्ट झालेल्या गावांच्या हद्दीत आहेत. कोंढवा, मुंढवा, हडपसर या भागांत तर पेव फुटले आहे. त्यामुळे परिसराला बकालपणा आला आहेच; शिवाय मध्यवस्तीत, रस्त्याच्या कडेला, काही ठिकाणी रस्त्याच्या मध्येच येणार्या होर्डिंगमुळे मानवी वर्दळीला धोका पोहचू शकतो. कोथरूड, बावधन, बाणेर, सिंहगड रस्ता या परिसरात अधिकृत होर्डिंग जास्त आहेत. असे असले तरी त्या ठिकाणीही सुरक्षेच्या काही सामान्य नियमांचे उल्लंघन झाले आहे. दिलेल्या परवानगीपेक्षा अधिक उंचीवर, अधिक जागेत अशी होर्डिंग लावण्यात आली आहेत. त्यामध्ये राजकीय फ्लेक्सचे प्रमाण मोठे आहे.
किवळेमधील घटनेनंतर शहर आणि उपनगरांत महापालिका अधिकाऱ्यांनी फ्लेक्ससह होर्डिंगवर कारवाई सुरू केली आहे. मुंढवा, हडपसर, मगरपट्टा, बिबवेवाडी या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र, अनधिकृत होर्डिंगच्या तुलनेत होणारी कारवाई अत्यल्प आणि नेहमीप्रमाणे अल्पजीवी ठरणारी आहे. बिबवेवाडी परिसरात 87 होर्डिंगना परवानगी दिलेली आहे. प्रत्यक्षात त्या ठिकाणी 140 होर्डिंग आहेत. सिंहगड रस्त्यावर काही दिवसांपूर्वी एक होर्डिंग कोसळले होते. त्या वेळी कोणतेही नुकसान झाले नाही. अशा घटना रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी नागरिक करीत आहेत.