पुणे

तेव्हा तमाशातील राजा अन् आता अन्नाला महाग ! वृद्ध कलावंताची दुर्दैवी शोकांतिका

अमृता चौगुले

बापू जाधव : 

निमोणे : शिरूर तालुक्यातील गुनाट हे गाव लोककलावंतांची पंढरी म्हणून ओळखले जाते. दादू भालेराव, दादू जाधव, सोनबा गुनाटकर हे नामवंत तमाशा फडमालक याच भूमीतील. एकेकाळी लोककलेच्या धुंदीत धुंद झालेल्या या कलावंतांना आयुष्याच्या संध्याकाळी अनंत हालअपेष्टांना सामोरे जावे लागले. अशीच परिस्थिती येथील तमाशातील अन्य राजांची देखील झाली असून, ते आज अन्नाला देखील महाग झाले आहेत. मुक्ताराम ऊर्फ मुकिंदा आखुटे हे पंचाहत्तरीत पोहचलेले वयोवृध्द कलावंत एकेकाळी महाराष्ट्रातील सगळ्याच नामवंत तमाशा फडात सोंगाड्या म्हणून गाजले. गण, गवळण, बतावणी झाली की वगनाट्यात हमखास राजा म्हणून स्टेजवर येणारा हा गडी आज दोनवेळच्या अन्नाला महाग झाला आहे.

कलावंत त्याच्या धुंदीत जगतो, कलेची कैफ चढलेला हा गडी ऐन उमेदीमध्ये उभा महाराष्ट्र फिरला, कलेच्या जिवावर सगळीकडे नाव झाले. मागील 5 ते 10 वर्षांपासून शरीर साथ देईना, तमाशा सुटला. जीवनभर लोककलेच्या मंदिरातील नंदादीप प्रज्वलित ठेवण्यासाठी बेफिकीर होऊन वाटचाल करणार्‍या मुक्ताराम आखुटे यांना आयुष्याच्या संध्याकाळी विविध व्याधींनी घेरले.

तब्बल 50 ते 55 वर्षे तमाशामध्ये पट्टीचा कलाकार म्हणून काम केल्यानंतरही कलावंतासाठी असणारे मानधन या गड्याच्या वाट्यालाच आले नाही. ही कथा एकट्या मुक्तारामची नाही, तर गुनाट परिसरातील असंख्य लोककलावंत हक्काच्या मानधनापासून वंचित आहेत. वेळप्रसंगी सावकारी कर्ज घेऊन तमाशा उभा करणार्‍या सोनबा गुनाटकरांना पोटाची खळगी भरण्यासाठी उतारवयात पोटावर ताशा घेऊन जगण्याची धडपड करावी लागत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT