पुणे

पुणे बाजार समितीत चोर्‍या वाढल्या ; नव्या संचालकांच्या दिमतीला असल्याने सुरक्षारक्षकांचे चोर्‍यांकडे दुर्लक्ष

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळावर निवडून आल्यानंतर मार्केट यार्डातील फळे-भाजीपाला, गूळ भुसार बाजारात चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. दररोज शेतमालाच्या चोर्‍या होत होत्या. आता अक्षरश: दुकानांचे शटर तोडून चोर्‍या होऊ लागल्या आहेत. बाजारात असलेले सुरक्षारक्षक हे नव्या संचालकांच्या दिमतीला अधिक असल्याने या चोर्‍यांकडे दुर्लक्ष होत आहे. यामध्ये व्यापारी आणि अडत्यांचे मोठे नुकसान होत आहे.

मार्केट यार्डात शेतमाल चोर्‍यांसह गाळ्यावर गांजा, दारू पिणे, सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या तोडफोडीच्या घटना वारंवार घडतात. गूळ भुसार बाजारात नेहरू रस्त्यावरील दोन दुकाने फोडली होती. त्यापैकी एका दुकानातून सुमारे 30 हजार रुपयांची, तर भगवती ट्रेडर्स या दुकानातून सुमारे तीन लाखांची चोरी झाली होती. गेल्या आठ दिवसांपूर्वी ज्योती पान शॉप फोडून रोख रकमेसह सुमारे पन्नास ते साठ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. याबाबत संबंधितांनी पोलिसांत तक्रारी दिल्या आहेत. दुसरीकडे फळे, भाजीपाला बाजारात गाळ्यांवरून भाजीपाल्यासह आंबा, सफरचंद पेट्यांच्या पेट्या लंपास केल्या जात आहेत.

एका संचालकालाच सुरक्षेचा ठेका?
बाजार समितीच्या निवडणूक काळात एका संचालकाचे बॅनर, पोस्टर लावण्याचे काम सुरक्षारक्षक करीत असल्याचे समोर आले होते. याबाबत तक्रारी येऊनही बाजार समितीने त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे टेंडर जरी दुसर्‍याच्या नावावर असले तरी तो एक संचालक सांगेल त्याप्रमाणेच सुरक्षाव्यवस्थेचे काम करीत असल्याची चर्चा बाजारात आहे.

बाजारात चोर्‍या वाढल्या असून, चोऱ्या करणाऱ्यांचे चेहरे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात स्पष्ट दिसतात. चोरांच्या दहशतीमुळे कोणतीही कारवाई करीत नाहीत. चोरी केलेला शेतमाल गेटच्या बाहेर नेताना सुरक्षारक्षक त्यांना हटकत नाहीत. सध्या एका आंब्याची पेटी चार ते पाच हजार रुपयांची आहे. यामध्ये शेतकरी आणि अडत्यांचे नुकसान होत आहे. मोठा खर्च करूनही बाजाराची सुरक्षा उपयोगाची आहे का? असा प्रश्न पडतो.
                     – युवराज काची, माजी उपाध्यक्ष, अडते असोसिएशन

बाजारातील चोर्‍यांच्या पार्श्वभूमीवर रात्र गस्तीसाठी फिरते वाहन ठेवण्यात आले आहे. सुरक्षाव्यवस्थेत आवश्यक त्या सुधारणा लवकरच केल्या जातील.
                               – डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, बाजार समिती पुणे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT