पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील एकपडदा चित्रपटगृहे अद्यापही बंद असल्याचा परिणाम आता बालचित्रपट महोत्सवाच्या आयोजनावर झाला असून, यंदा बालचित्रपट महोत्सव करायचा कुठे हा प्रश्न आयोजकांना पडला आहे. त्यात मल्टिप्लेक्सचे भाडे परवडणारे नसल्याने या वर्षी बालनाट्य महोत्सवाच्या आयोजनाच्या तयारीत बालचित्रपट महोत्सवाचे आयोजक आहेत.
एकपडदा चित्रपटगृहे आर्थिक फटक्यातून अजूनही बाहेर न पडल्याने शहर आणि उपनगरातील बहुतांश चित्रपटगृहे बंद असून, फक्त दोन ते तीन चित्रटगृहे सुरू आहेत; परंतु तीही चित्रपट महोत्सवांसाठी उपलब्ध नाहीत. त्यामुळेच उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांना चित्रपट महोत्सवाऐवजी नाट्य महोत्सव, अभिवाचनाचे कार्यक्रम, जादूचे प्रयोग, एकपात्री प्रयोग, अभिनय कार्यशाळा अशा कार्यक्रमांचा आनंद घ्यावा लागणार आहे.
संपूर्ण राज्यासह पुण्यातील एकपडदा चित्रपटगृहे अद्यापही बंद आहेत. महोत्सवांसाठी आयोजकांना खासगी छोट्या चित्रपटगृहांचा रस्ता धरावा लागत आहे; परंतु त्यांचेही भाडे परवडणारे नसल्याने आता आयोजकांनी इतर मनोरंजक कार्यक्रमांच्या आयोजनाकडे मोर्चा वळवला आहे. पुणे एक्झिबिटर्सचे अध्यक्ष अशोक मोहोळ म्हणाले, 'आजच्या घडीला एकपडदा चित्रपटगृहे आर्थिकदृष्ट्या चालविणे अशक्यच आहे.
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारकडे आम्ही एकपडदा चित्रपटगृहांच्या जागी दुसरा व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. आता सरकारही बदलले आहे. नवीन सरकारकडेही मागणीचा पत्रव्यवहार सुरू आहे. पण, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आता चित्रपटगृहे बंद ठेवल्याने बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन अशक्य आहे.'
'संवाद, पुणे'चे अध्यक्ष सुनील महाजन म्हणाले, 'सर्व व्यवहार सुरळीत झाले असले तरी एकपडदा चित्रपटगृहे अद्याप बंदच असल्याने बालचित्रपट महोत्सव करायचा कुठे, हा प्रश्न आहे. त्यामुळे बालचित्रपट महोत्सवांच्या जागी बालनाट्य महोत्सव आयोजित करीत आहोत. 17 ते 21 एप्रिलला कोथरुड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात बालनाट्य महोत्सव आयोजित करणार आहोत.'