पुणे

Ashadhi wari 2023 : भक्तिरसात न्हाऊन निघाली तरुणाई ; सामाजिक कार्यातही युवकांचा पुढाकार

अमृता चौगुले

निखिल जगताप : 

बेलसर : दिवे घाटाचा अवघड टप्पा पार करून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सासवड मुक्कामी विसावला. मोठ्या उत्साहात तरुणवर्ग पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाला आहे. अनेक दिंड्यांमध्ये युवा वारकरी प्रामुख्याने सहाभागी असलेले दिसून आले, तर तालुक्यातील तरुणवर्ग विविध पध्दतीने वारकर्‍यांची सेवा करण्याचे काम करताना दिसत आहे. सोशल मीडियाच्या जमान्यात संतविचार व परंपरा जपण्यात तरुणवर्ग कमी आहे, असे म्हटले जाते. परंतु, ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये अनेक दिंड्यांमध्ये दिंडीचालक, वीणेकरी, झेंडेकरी, मृदंगवादक, टाळकरी, गायक हे वय केवळ 20 ते 30 या वयोगटातील आहेत. त्यांची भक्ती व नियोजन, याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. याच तरुण पिढीमुळे समाज योग्य दिशेने वाटचाल करीत असल्याचे जाणवते.

पुरंदर तालुक्यात पालखी सोहळ्याचे आगमन झाल्यावर अनेक सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये, तरुण मंडळे, गणपती मंडळे, ग्रुप हे विविध प्रकारे वारकर्‍यांची सेवा करताना दिसत आहेत. अन्नदान, स्वागत कक्ष, औषध वाटप, पाणी व फराळ वाटप, अशा विविध सेवा देण्यासाठी पुरंदरमधील तरुण समोर येऊन एकसंध काम करीत आहेत. त्यामुळे या वारीच्या रूपाने तरुणवर्गातील एकजूट व संस्कार समोर आले आहेत. वृक्षारोपणाचा वसा हातात घेऊन तरुण काम करताना दिसत आहेत.

वारी पुढे जात असताना स्वच्छता अभियानासाठी पुढे सरसावलेले तरुणही कौतुकास पात्र आहेत. वारीचा नयनरम्य सोहळा अनुभवल्यानंतर परिसर स्वच्छतेचा वसा याच तरुणाईने घेतल्याचे दिसून येते. त्यामुळे तरुणाईमध्ये असलेली समाजाप्रती भावना व समाजसेवा करण्याची प्रबळ इच्छा वारीमध्ये दिसून येत आहे. दिवे घाट पार करण्यासाठी तरुणांनी हाताची साखळी करून संपूर्ण घाटात बैलजोडीला वाट करून दिली, तर संपूर्ण घाटातील पालखी ओढण्याच्या नियोजनात तरुण सहभाग घेताना दिसत आहे. त्यामुळे वारी सोहळ्याच्या स्वागतासोबतच जमेल ते काम करणारा तरुण कौतुकास पात्र आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT