पुणे: खासगी रुग्णालयातील निवासी डॉक्टर तरुणाने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. डॉक्टर तरुणाच्या आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नसून, कोरेगाव पार्क पोलिसांनी तरुणाचा मोबाइल तांत्रिक विश्लेषणासाठी ताब्यात घेतला आहे.
डॉ. श्याम व्होरा (वय 28) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली आहे. रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कोरेगाव पार्क पोलिसांना माहिती मिळाली होती. (Latest Pune News)
डॉ. व्होरा मूळचे गुजरातचे आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती कळविण्यात आली असून, कुटुंबीय पुण्यात पोहोचले आहेत. ससून रुग्णालयात शवविच्छेदन केले आहे. सायंकाळी कुटुंबीयांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला.
याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे, अशी माहिती कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील थोपटे यांनी दिली. डॉ. व्होरा हे मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या अकस्मात मृत्युमुळे सहकार्यांना धक्का बसला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर रुग्णालयाच्या परिसरात शोककळा पसरली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. व्होरा हे बंडगार्डन रस्त्यावरील रुबी हॉल क्लिनीकमध्ये निवासी डॉक्टर म्हणून काम करत होते. रविवारी (दि. 8 जून) दिवसभर त्यांच्या खोलीचा दरवाजा बंद होता. दरवाजा न उघडल्याने सहकार्यांना संशय आला. त्यांनी या घटनेची माहिती रुग्णालयाच्या वसतिगृहातील सुरक्षारक्षकांना दिली. रविवारी रात्री दहाच्या सुमारास सुरक्षारक्षकांनी दरवाजा वाजविला. डॉ. व्होरा यांनी प्रतिसाद न दिल्याने संशय आला. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती कळविण्यात आली.
वसतिगृहातील खोलीचा दरवाजा तोडण्यात आल्यानंतर डॉ. व्होरा यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. खोलीत एक चिठ्ठी सापडली असून, त्यात मोबाइलचा गोपनिय क्रमांक (पासवर्ड) लिहून ठेवला आहे. पोलिसांनी तपासासाठी मोबाइल ताब्यात घेतला आहे. डॉ. व्होरा यांच्या आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.
रुबी हॉल क्लिनिक प्रशासनातर्फे ज्यनियर डॉक्टरच्या आत्महत्येबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. रुबी हॉलच्या कायदेशीर सल्लागार अॅड. मंजुषा कुलकर्णी म्हणाल्या, आमच्या निवासी डॉक्टरांपैकी एक डॉ. श्याम वोरा यांनी वसतिगृहातील खोलीत आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे. ही अत्यंत दुःखद बातमी आहे. या प्रकरणाचा तपास सध्या पोलिसांकडे असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
रहिवासी डॉक्टरला कामाच्या ठिकाणी त्रास दिल्याच्या माध्यमातून होणार्या चर्चा पूर्णतः निराधार आणि चुकीच्या आहेत, हे स्पष्टपणे नमूद करावेसे वाटते. तपास पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणे अथवा अफवा पसरवणे टाळावे, अशी आम्ही नम्र विनंती करतो. या अत्यंत दु:खद प्रसंगी डॉ. वोरा यांच्या कुटुंबीयांप्रती, मित्र- मैत्रिणी आणि सहकार्यांप्रती आमच्या मनःपूर्वक सहवेदना व्यक्त करतो, असेही रुग्णालय प्रशासनाने नमूद केले आहे.