भीमाशंकर; पुढारी वृत्तसेवा : सरकारने पाच तीर्थक्षेत्रांसाठी 300 कोटी रुपये मंजूर केले आहेत. यामध्ये भीमाशंकरलाही 60 कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर यांनी दिली. यामधून येथील बऱ्यापैकी कामे मार्गी लागणार असल्याचे माहिती इंदलकर यांनी दिली. इंदलकर यांनी सांगितले की, भीमाशंकर विकास आराखडा हा 148 कोटींचा असून, तत्कालीन अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंजूर केला होता.
हा आराखडा विशेष आराखडा असून, यामध्ये पुरातत्त्व विभागाकडून मंदिराची डागडुजी तसेच दगडी रेखीव काम करण्यासाठी तसेच महिंद्रा कंपनीच्या 20 व मिनीबससाठी 4 कोटी 75 लाख रुपये, नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 8 कोटी 96 लक्ष रुपये तसेच मंदिर संवर्धन मोक्षकुंड इतर कुंडे, भीमापात्र दगडी सभामंडप यासाठी 38 कोटी अपेक्षित आहेत. यातील 19 कोटी 75 लक्ष खर्च झाले आहेत.
कोंढवळ ते भीमाशंकर मुख्य रस्ता या 7 किलोमीटरच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी 11 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, यातील 8 कोटी रुपये खर्च झाले आहेत. बसस्थानक परिसरात नवीन सुलभ शौचालय, बॉम्बे पाँईट व मंदिराजवळील जिल्हा परिषदेचे जुने स्वच्छतागृह दुरुस्त करण्यासाठी एकूण 6 कोटी खर्च अपेक्षित होता, त्यातील 4 कोटी निधी खर्च झाला आहे. आता नव्याने मंजूर झालेल्या 60 कोटी रुपयांमध्ये भीमाशंकर विकास आराखड्याला अपेक्षित कामे व विद्युतीकरणदेखील केले जाणार असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर यांनी सांगितले.