हडपसर : पुढारी वृत्तसेवा : 'हडपसर भाजीपाला खरेदी-विक्री संघाची अमृतमहोत्सवी वाटचाल प्रेरणादायी असून, ही संस्था सर्वसामान्यांचे हित जपण्याचे कार्य करीत आहे. शेतकरी, कामगार यांचा आर्थिक कणा मजबूत करण्यासाठी संघाचे कार्य निरंतर सुरू आहे,' असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले. हडपसर भाजीपाला खरेदी-विक्री सहकारी सोसायटीच्या 75व्या अमृतमहोत्सवी समारंभाचे मंगळवारी मांजरी रोड परिसरातील नेताजी सुभाष मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यापारी संकुलाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांना स्व. रामभाऊ तुपे समाजसेवक पुरस्कार, तर मगरपट्टा सिटीचे प्रवर्तक सतीश मगर यांना स्व. अण्णासाहेब मगर उद्ममशीलता पुरस्कार प्रदान करण्यात आला. अमृत स्मृती गौरव विशेषांकाचेही या वेळी प्रकाशन करण्यात आले.
पवार म्हणाले, 'शेतकरी आणि कष्टकर्यांचा भाग, तसेच समाजवादी विचारांची प्रेरणा म्हणून हडपसरची ओळख आहे. या ठिकाणी कष्टकरी व शेतकर्यांच्या कल्याणासाठी विविध संस्थांचे कार्य सुरू आहे.' आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, सोसायटीचे अध्यक्ष प्रवीण तुपे, उपाध्यक्ष साहेबराव काळे, बाळासाहेब शिवरकर, जगन्नाथ शेवाळे, महादेव बाबर, दिलीप तुपे, नीलेश मगर,अनिल गुजर, संचालक युवराज शेवाळे, प्रा. जे. पी. देसाई, बाळासाहेब गोगावले, विठ्ठल सातव, सुजित गोगावले, संगीता तुपे, शंकर पवार, शिवाजी खोमणे, जिजाबा बांदल, रतन काळे, विजय तुपे, राजेंद्र तुपे, संजीवनी जाधव, रामदास कसबे, प्रमोद तुपे, जयप्रकाश जाधव आदी उपस्थित होते.