पुणे

पुणे : आंबिल ओढ्यावरील कल्व्हर्टचे काम संपता संपेना

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पर्वती येथे आंबिल ओढ्यावर कल्व्हर्ट (पूल) बांधण्याचे महापालिकेने हाती घेतलेले काम कासवगतीने सुरू असून, तीन वर्षांनंतरही पूर्ण होण्याचे नाव घेत नाही. येथील जलवाहिनीच्या स्थलांतरामुळे अर्धवट झालेल्या अरुंद पुलावर दोन्ही बाजूंनी चारचाकी गाड्या पार्क केल्या जातात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

शहराच्या दक्षिण भागात 25 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबिल ओढ्यासह शहरातील इतर ओढ्यांना पूर आला होता. यामध्ये आंबिल ओढ्याच्या पुराने रुद्रावतार धारण करत मोठे नुकसान केले होते. या पुरात ओढ्यांवरील कल्व्हर्टचेही मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे महापालिकेने आंबिल ओढ्यासह हिंगणे, वडगाव, आनंदनगर परिसरातील ओढ्यांवर 21 कल्व्हर्ट बांधण्याचे काम हाती घेण्यात आले.

ओढ्यांना सप्टेंबर 2019 मध्ये पूर आल्यानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये 21 कल्व्हर्ट बांधण्यासाठी दोन ठेकेदारांना वर्क ऑर्डर दिल्या. यामध्ये मित्रमंडळ चौकाकडून पर्वतीकडे जाण्यासाठीही आंबिल ओढ्यावर कल्व्हर्ट बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. या कल्व्हर्टला लागूनच जलवाहिनी असल्याने 80 टक्के कामच पूर्ण करून हा पूल वापरण्यास खुला करण्यात आला.

मात्र, गेली दीड वर्षापासून येथील जलवाहिनी स्थलांतर करण्याचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. आता या जलवाहिनीसाठी ओढ्यामध्ये कॉलम उभे करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पावसाळा तीन महिन्यांवर आलेला असतानाही हे काम कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यापूर्वी या कल्व्हर्टचे काम पूर्ण होणार की अर्धवटच राहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अरुंद पुलावरच पार्किंग
जलवाहिनी स्थलांतरामुळे अर्धवट व अरुंद असलेल्या पुलावरच रहिवाशांकडून दोन्ही बाजूंनी चारचाकी वाहने पार्किंग केली जातात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. तसेच या ठिकाणी काही वाहने अनेक महिन्यांपासून धुळखात उभी असल्याचेही चित्र दिसते.

SCROLL FOR NEXT