यवत: दोन्ही कुटुंबांच्या संमतीने लग्न ठरले. लग्नाची 12 मार्च ही तारीख देखील निघाली. त्यामुळे नियोजित वर-वधू यांचे सासवड (ता. पुरंदर) परिसरात प्री-वेडिंग शूट देखील पार पडले. मात्र, नियोजित वधूला वर पसंत नसल्याने तिने नियोजित वराला मारण्याची सुपारी दिली आणि या वराला मारहाण करण्यात आली. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यात सहभागी पाच जणांना अटक केली असून, सुपारी देणारी वधू मात्र फरार झाली आहे. दरम्यान, हा विवाह पूर्वीच रद्द करण्यात देखील आला हे विशेष.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सोलापूर-पुणे रस्त्यावरील खामगाव (ता. दौंड) हद्दीत असलेल्या हॉटेल साई मिसळसमोर सागर कदम थांबले होते. या वेळी पांढर्या रंगाच्या चारचाकी गाडीतील अज्ञातांनी गाडीखाली उतरून ‘जर तू मयूरीशी लग्न केले, तर तुला बघून घेतो’ असे म्हणून लाकडी दांडक्याने मारहाण केली. यवत पोलिसांनी तत्काळ याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करत असताना यवत पोलिसांना शुक्रवारी (दि. 28 मार्च) संशयित आदित्य शंकर दांगडे (वय 19, रा. गुघलवडगाव, ता. श्रींगोदा, जि. अहिल्यानगर) याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा गुन्हा हा मयूरी सुनील दांगडे (रा. गुघलवडगाव, ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर) आणि संदीप दादा गावडे (वय 40, रा. गुघलवडगाव, ता. श्रींगोदा, जि. अहिल्यानगर) यांच्या सांगण्यावरून मयूरीला होणारा नवरा सागर कदम हा पसंत नसल्याने 1 लाख 50 हजारांची सुपारी घेऊन इतर तीन साथीदारांसोबत केल्याचे कबूल केले.
त्यानुसार यवत पोलिसांनी संशयित संदीप दादा गावडेसह शिवाजी रामदास जरे, इंद्रभान सखाराम कोळपे (वय 37, दोघेही रा. पिंपळगाव पिसा, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) आणि सुरज दिगंबर जाधव (वय 36, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर) यांच्यावर सागर कदम याला मारहाण केले असल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी घटनाक्रम सांगताना सांगितले की, संशयित आदित्य दांगडे, मयूरी दांगडे, संदीप गावडे, शिवाजी जरे, इंद्रभान कोळपे आणि सुरज जाधव यांनी कट रचून यातील फिर्यादी सागर कदम यास जिवे मारण्याच्या उद्देशाने यवत पोलिस स्टेशन हद्दीतील खामगाव फाटा येथे अडवून लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली होती.
आरोपींकडून वेरणा गाडी व मारहाण केलेले दांडके जप्त करण्यात आहे आहे. याबाबत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील महिला आरोपी मयूरी दांगडे ही अद्याप फरार असून, बाकी संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.