...अन् रानभाजी प्रयोगाने दिला जगण्याला आधार; सीमा जाधव यांची यशोगाथा Pudhari
पुणे

...अन् रानभाजी प्रयोगाने दिला जगण्याला आधार; सीमा जाधव यांची यशोगाथा

चिंबळीत एकदिवसीय सेंद्रिय शेती कार्यशाळा

पुढारी वृत्तसेवा

आळंदी: डोंगराळ भागात येणार्‍या कर्टुले रानभाजीचा प्रयोग आमच्या शेतात करणे, हे आमच्यासाठी खूप आव्हानात्मक होते. मात्र, आम्ही त्यावर अभ्यास करत त्याचे उत्पादन घेतले. आज हीच पालेभाजी आम्हाला लाखो रुपयांचा नफा मिळून देते. रानभाजीचा हाच प्रयोग आमच्या जगण्याला आधार ठरला आहे, असे मत चिंबळी (ता. खेड) येथील प्रयोगशील महिला शेतकरी सीमाताई चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग खेड व प्रयोगशील महिला शेतकरी सीमा जाधव यांच्या संयुक्त विद्यमाने चिंबळी (ता. खेड) येथे एकदिवसीय सेंद्रिय शेती कार्यशाळा आयोजित करीत औषधी गुणधर्म असलेली रानभाजी कर्टुले लागवड याविषयी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात जाधव यांनी रानभाजी उत्पादन व विक्रीसंदर्भात संपूर्ण मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत अमृत संजीवनी फार्मर प्रोड्यूसर कंपनी चिंबळी, भुजबळ अ‍ॅग्रो प्रोड्यूसर कंपनी, शिरोली, महाराष्ट्र महाबीज मंडळ पुणे, शाश्वत कृषी विकास फार्मर प्रोड्यूसर कंपनी पुणे यांनी सहभाग घेतला.

या वेळी उपविभागीय कृषी अधिकारी सतीश शिरसाठ, तालुका कृषी अधिकारी नंदकुमार वाणी, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक विलास कातोरे, सरपंच ज्योती जैद, माजी सरपंच मच्छिंद्र भुजबळ, मृदाशास्त्रज्ञ योगेश यादव, दै. ’पुढारी’च्या वरिष्ठ पत्रकार सुषमा नेहरकर, ग्रामपंचायत सदस्या ज्योती जाधव, सोसायटी संचालक आप्पासाहेब बटवाल, महाराष्ट्र बियाणे महामंडळाचे पुरुषोत्तम काटे, निवृत्त कृषी अधिकारी ताराचंद परदेशी, चंद्रकांत जाधव, मधुमक्षिकापालक शास्त्रज्ञ हेमंतकुमार डुबरे, अमृत संजीवनी फार्म प्रोड्यूसर कंपनीचे संचालक सत्यवान बटवाल आदींसह शेतकरी उपस्थित होते.

गटशेतीतून समृद्धी साधा, सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. येत्या काळात शाश्वत आणि सेंद्रिय उत्पादनांची मागणी असणार आहे. शासकीय योजनांचा लाभ घेऊन शेतकर्‍यांनी शेतीत नवे प्रयोग राबवावे. सीमा जाधव यांचा प्रयोग शेतकर्‍यांसाठी रोल मॉडेल आहे.
- सतीश शिरसाठ,उपविभागीय कृषी अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT