पुणेकरांच्या पाण्यावर जलसंपदाला हवाय कंट्रोल Pudhari
पुणे

पुणेकरांच्या पाण्यावर जलसंपदाला हवाय कंट्रोल

पाण्याचा अतिरिक्त वापर रोखण्यासाठी पंपगृह हस्तांतरित करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Pune News: महापालिकेकडून पुणेकरांना केल्या जाणार्‍या पाणीपुरवठ्यावर आता जलसंपदा विभागाला नियंत्रण ठेवायचे आहे. मंजूर केलेल्या कोट्यापेक्षा महापालिका अतिरिक्त पाण्याचा वापर करीत असल्याने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने ताशेरे ओढल्यानंतर खडकवासला धरणाखालील पंपगृहाचे नियंत्रण जलसंपदा विभागाकडे हस्तांतरित करावे, अशी सूचना पाटबंधारे विभागाने थेट महापालिकेला केली आहे. त्यावर आता महापालिका काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पुणे शहराला खडकवासला धरणसाखळीतून पाणीपुरवठा होतो. पाटबंधारे विभागाने त्यासाठी गतवर्षी महापालिकेला लोकसंख्येनुसार 12.42 टीएमसी इतका पाणीसाठा मंजूर केला आहे. मात्र, महापालिकेकडून प्रत्यक्षात 21 टीएमसी इतके पाणी उचलण्यात आले आहे.

पाण्याच्या या अतिरिक्त वापराबाबत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने महापालिकेवर ताशेरे ओढले होते. तसेच, पाण्याचा हा अतिरिक्त वापर कमी करण्याचे आदेशही दिले होते. त्यासाठी प्रामुख्याने वितरण व्यवस्थेतील गळती रोखण्याबरोबरच पाणी मीटर बसवून त्यानुसार पाणीपुरवठा करण्याच्या सूचना केल्या आहेत.

दरम्यान, जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने कान टोचल्यानंतर आता पाटबंधारे विभागानेच महापालिकेचा अतिरिक्त पाणीपुरवठा रोखण्यासाठी कडक भूमिका घेतली आहे. त्यासाठी खडकवासला धरणाखालील ज्या पंपगृहातून शहरासाठी पाणी सोडले जाते, त्याचेच नियंत्रण जलसंपदा विभागाला देण्याची सूचना पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याने महापालिकेला पत्राद्वारे केली आहे.

तसेच, पंपगृहात नक्की किती पाणी सोडले जाते, हे तपासण्यासाठी बसविण्यात आलेले मीटर सद्य:स्थितीला बंद असून, तेही तातडीने दुरुस्त करावे, असेही पाटबंधारे विभागाने महापालिकेला कळविले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT