जलवाहिनी पुन्हा फुटली; लाखो लिटर पाणी वाया Pudhari
पुणे

जलवाहिनी पुन्हा फुटली; लाखो लिटर पाणी वाया

पाण्याचा प्रचंड वेग; दांडेकर पुलाजवळ रस्ता उखडला

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पर्वती जलकेंद्रातून मध्यवर्ती भागाला पाणीपुरवठा करणारी 700 मिमी व्यासाची जलवाहिनी पुन्हा एकदा दांडेकर पूल परिसरात फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. थेट रस्त्यावरच जलवाहिनी फुटल्याने सिंहगड रस्त्यावरील वाहतूक बंद करावी लागली, त्यामुळे या भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली.

दांडेकर पुलावरून स्वारगेटकडे जाणार्‍या रस्त्यावर रात्री साडेनऊच्या सुमारास ही जलवाहिनी फुटली. फुटलेल्या जलवाहिनीतील पाण्याचा वेग मोठा असल्याने या ठिकाणचा रस्ता पूर्णतः उखडून गेला होता.

धक्कादायक म्हणजे दोन दिवसांपूर्वीच याच भागात शिवाजीनगरला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली होती. त्याचे दुरुस्तीचे काम सुरू असतानाच आता दुसरी जलवाहिनी फुटली आहे. ही माहिती मिळताच पाणीपुरवठा बंद करण्यात आला. मात्र, तरी जवळच असलेल्या घराच्या परिसरात पाणी शिरू लागले होते.

दरम्यान, फुटलेल्या जलवाहिनीतील पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने स्वारगेटकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली होती, तर काही वेळाने रस्त्याच्या दुसर्‍या बाजूनेही मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने जलवाहिनी दोन ठिकाणी फुटल्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

रात्री उशिरा ही जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम सुरू करण्यात आल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. मात्र, दुरुस्तीला वेळ लागण्याची शक्यता असल्याने मध्यवस्तीसह शिवाजीनगर परिसराचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.

चौथ्यांदा पाइपलाइन फुटली

दांडेकर पूल परिसरात एकच पाइपलाइन चौथ्यांदा फुटली आहे. ही जलवाहिनी जुनी असून, पूर्वी या जलवाहिनीतून प्रक्रिया न केलेल्या पाण्याचा पुरवठा होत होता. आता त्यातून शुद्ध पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळेही सातत्याने फुटण्याच्या घटना घडतात. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या 90 फुटी देखाव्याखाली फुटलेल्या पाइपलाइनचे पाणी साचले आहे. देखाव्याच्या लाकडांना ओल लागल्याने देखाव्याचे नुकसान झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT