पुणे

पुणे : युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ गाव एकवटले ; सांगवी येथे कडकडीत बंद पाळून निषेध मोर्चा

अमृता चौगुले

सांगवी : पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील सांगवी येथे जमिनीच्या वादातून विनोद हिराचंद फडतरे या युवकाचा चुलत भाऊ विशाल गणपत फडतरे या माथेफिरूने बुधवारी (दि. 12) डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून केला होता. ही हत्या आरोपीचा बाप गणपत फडतरे व भाऊ विक्रम फडतरे यांनी कट रचूनच केल्याचा आरोप निषेध सभेत करण्यात आला. मुख्य आरोपी विशाल फडतरे या माथेफिरूस फाशीची शिक्षा व कट रचणार्‍या बापलेकाला कठोर शिक्षेच्या मागणीसाठी गावात कडकडीत बंद पाळून निषेध मोर्चा काढण्यात आला. गावात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये, यासाठी संपूर्ण गाव एकवटले होते.

सांगवी गावाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असल्याने सर्वस्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. या हत्येतील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. परंतु सहआरोपी माजी सैनिक गणपत फडतरे व पुणे शहर पोलिस दलात असलेल्या विक्रम फडतरे यांना चार दिवस उलटले तरी अटक होत नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावात कडकडीत बंद पाळून निषेध मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. शनिवारी (दि.15) सकाळी चांदणी चौक येथे येथून मोर्चाला सुरुवात होऊन, जुना बाजारतळमार्गे ग्रामपंचायत कार्यालय, मुख्य बाजारपेठ, छत्रपती संभाजी महाराज चौक, कांबळेश्वर-सांगवी मार्गावरून बारामती-फलटण रस्त्यावरील चांदणी चौक येथे येऊन निषेध सभेत रूपांतर झाले. या मोर्चात शेकडो महिलांसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.

विनोद फडतरे या युवकाच्या हत्येने संपूर्ण कुटुंबीय भयभीत झाले आहे. त्या कुटुंबातील सर्व सदस्यांना न्याय देण्यासाठी पोलिस प्रशासनाने मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा व सह आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी पुरावे गोळा करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. तसेच गणपत फडतरे या आरोपीने इतर नातेवाइकांना दिलेल्या त्रासाची चौकशी व्हावी, विक्रम फडतरे याच्यावर पुणे शहरात बलात्कारासह इतर गुन्ह्याची माहिती पोलिसांनी संकलित करून कठोर शिक्षेसाठी पुरावे सादर करून फिर्यादीची बाजू मजबूत करण्याची मागणी केली.

या वेळी माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे, माजी संचालक विजय तावरे,रामभाऊ तावरे,संजय तावरे,संतोष जाधव,मच्छिंद्र टिंगरे,रामभाऊ जगताप,मीनल जगताप यांनी निषेध व्यक्त केला. मुख्य आरोपी विशाल फडतरे यास फाशीची शिक्षा व सह आरोपी गणपत फडतरे व भाऊ विक्रम फडतरे यांना कठोर शिक्षेच्या मागणीचे निवेदन तपासी अधिकारी तथा माळेगाव ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण अवचर यांना देण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT