भोसरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी- चिंचवडमध्ये असे अनेक चौक आहेत, जिथे ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली आहे; परंतु सिग्नल यंत्रणा केवळ शोभेची वस्तू बनले आहेत.
हे सिग्नल्स बर्याच दिवसांपासून बंद आहेत; मात्र वाहतूक पोलिस, महापालिका प्रशासन, संबंधित विभागातील अधिकारी ते सुरू करण्याची तसदी घेत नाहीत.
त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थाही सुधारत नसल्याचे चित्र आहे. गर्दीच्या वेळी वाहनांची मोठी वर्दळ असते. सिग्नल बंद असल्याने गाड्या चौकात थांबत नाहीत.
परिणामी नागरिकांना व वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. परिसरातील बंद ट्राफिक सिग्नल पालिका प्रशासनाने सुरळीत चालू करावी, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.
भोसरी परिसरात अनेक दिवसांपासून बंद असलेल्या सिग्नलकडे कोणीही लक्ष देत नाही. अनेक ठिकाणी सिग्नल काही दिवस सुरू असतात व अचानकपणे बंद पडत असल्याचे वाहनचालक सांगत आहेत.
उड्डाणपुलाखाली चांदणी चौक, भोसरी-आळंदी रस्ता, पुणे- नाशिक महामार्गावर, सद्गुरूनगर बस डेपो, इंद्रायणीनगर चौक, बालाजीनगर आदी ठिकाणी सिग्नल उभारण्यात आले आहे; परंतु अनेक ठिकाणचे वाहतूक सिग्नल बंद आहेत.
त्यामुळे या चौकातील वाहतूक रामभरोसे सुरू असते. त्यामुळे अपघाताचा धोका कायम आहे. अशातच चौकाचौकांतून सातत्याने भरधाव वाहने जात असल्याने अपघाताचा धोकाही वाढतो.
वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील प्रमुख चौकात वाहतूक सिग्नल बसविण्यात आले आहेत; मात्र दोन-चार ठिकाणे वगळता अवस्था बिकट आहे. लवकरच तपासणी करून बंद असलेले सिग्नल कार्यान्वित केले जातील, अशी माहिती अधिकार्यांनी दिली.
वाहतुकीस शिस्त लागावी; तसेच वाहतूक सुरळीतपणे सुरू राहिली पाहिजे, यासाठी सिग्नल बसविण्यात आले आहेत. परिसरात काही ठिकाणी मोठी वर्दळ असते.
सिग्नल बंद असल्याने आजूबाजूची वाहने ये-जा करतात. चौकाचौकात चारचाकी व दुचाकी वाहने उभी केली जातात. परिणामी वाहतूक कोंडी होती. त्यामुळे अपघात होतात.
भोसरी परिसरात अर्बन स्ट्रीटअंतर्गत कामे सुरू आहेत. त्यामुळे परिसरातील सिग्नल यंत्रणा बंद आहे. ही यंत्रणा कधी सुरू होईल, याबाबत माझ्याकडे माहिती नाही.
– प्रकाश कातोरे, कनिष्ठ अभियंता विद्युत विभाग, ई-क्षेत्रीय कार्यालय.
https://youtu.be/gUWZqZyNLD0