पुणे : पुढारी वृत्तसेवा : वेळ… सकाळी सव्वा नऊ वाजताची…कामावर पोहचण्यासाठी सर्वांची एकच धावपळ फरासखाना वाहतूक विभागाचे पोलिस कर्मचारी योगेश केंजळे कर्तव्यासाठी फडके हौद चौकाकडे निघाले होते. त्याचवेळी रस्त्याने पायी चालत निघालेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून चोरट्याने पळ काढला. हा प्रकार केंजळे यांच्या नजरेने अचूक हेरला. त्यांनी तात्काळ चोरट्याचा पाठलाग सुरू केला. भर रस्त्यात ही धावपळ सुरू होती. चोरटा पुढे आणि केंजळे मागे… चोरट्याने एका इमारातीचा लपण्यासाठी आश्रय घेतला. केंजळे याने त्याला रिक्षाचालकाच्या मदतीने झडप घालून पकडले. अन त्याला फरासखाना पोलिसांच्या हवाली केले.
योगेश चंद्रकांत केंजळे असे धाडसी कामगिरी करणार्या वाहतूक विभागात काम करणार्या पोलिस कर्मचार्याचे नाव आहे. अभिजीत शुभु (मुळ रा. पश्चिम बंगाल) याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश केंजळे हे फरासखाना वाहतूक विभागात पोलिस शिपाई पदावर काम करत आहेत. ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकिशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली फडके हौद चौक परिसरात त्यांचे कर्तव्य बजावण्यासाठी जात होते.
त्याला पकडल्यानंतर केंजळे यांनी त्याच्या खिशात काही घातक हत्यार आहे का याची तपासणी केली. याच दरम्यान तो झटका देऊन पळण्याचा प्रयत्न करत होता. परंतु केंजळे आणि रिक्षा चालकाने त्याला पकडून त्याच रिक्षावाल्याच्या रिक्षात बसवले. त्यानंतर सोनसाखळी चोरी झालेल्या महिलेलाही बसवून ते फरासखाना पोलिस ठाण्यात आले. त्याला लागलीच फरासखाना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी केंजळे यांच्या धाडसी कामगिरी बद्दल सहायक पोलिस आयुक्त सतिश गोवेकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद, पोलिस उपनिरीक्षक एन. आर. मोकाशी यांनी केंजळे यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक करून त्यांचा सत्कार केला. सध्या अभिजीत याला अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक सुशील बोबडे करत आहेत. यावेळी चोरट्याला पकडल्याबद्दल फिर्यादी महिलेने देखील केंजळे व संबंधीत रिक्षा चालकाचे आभार मानले.