पुणे; पुढारी वृत्तसेवा : तृतीयपंथींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेने 50 तृतीयपंथींना सुरक्षारक्षक म्हणून नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात 28 जणांना कामावर घेतले जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव सुरक्षा विभागाने तयार केला आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीसह, क्षेत्रीय कार्यालये, विविध वास्तू, मैदाने, उद्याने या ठिकाणी सुरक्षारक्षकांची नेमणूक केली जाते.
महापालिकेकडे सुरक्षारक्षकांच्या 650 जागा आहेत, त्यापैकी केवळ 320 सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. तृतीयपंथींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेत नोकरी मिळावी यासाठी काही सामाजिक संघटनांनी महापालिकेकडे मागणी केली होती. यासंदर्भात बैठकाही झाल्या आहेत. त्यामध्ये एकमत झाल्यानंतर प्रस्ताव मागविण्यात आले होते.
पहिल्या टप्प्यात सुरक्षा विभागात 50 जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचसोबत महापालिकेला कामाच्या ठिकाणी त्यांच्यासाठी चांगले वातावरण उपलब्ध करून देणे, स्त्री, पुरुष कर्मचार्यांचे वर्तनही चांगले ठेवणे यासाठी विशेष सूचना दिल्या जाणार आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 28 जणांना कामावर घेतले जाणार आहे.