पुणे

वारकरी विद्यार्थी व पोलिस वाद : तीस-पस्तीस वारकरी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास देवस्थान होते तयार

अमृता चौगुले

आळंदी : पुढारी वृत्तसेवा :  संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यादरम्यान मंदिरात प्रवेशावरून वारकरी विद्यार्थी व पोलिस यांच्यात उडालेल्या वादाचे पडसाद अद्यापही उमटतच असून, विविध घटकांकडून देवस्थानच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह व टीका होऊ लागल्याने अखेर घटनेच्या सहाव्या दिवशी शुक्रवारी (दि.16) देवस्थानकडून याबाबत घडलेल्या घटनेचा लेखी निवेदन प्रसिद्ध करत खुलासा करण्यात आला आहे. दर गुरुवारी माउलींच्या पालखीची प्रदक्षिणा होत असते यात वारकरी विद्यार्थी स्वइच्छेने सेवा देत असतात. प्रस्थान सोहळ्यादरम्यान तीनशे ते चारशेच्या आसपास विद्यार्थी जोगमहाराज शिक्षण संस्था जुन्या इमारती समोरील बोळात एकत्र आले त्यांनी तेथील पोलिसांना मंदिरात प्रवेश देण्याची विनंती केली, पोलिसांनी प्रवेश पास दाखवण्यास सांगितले ते नसल्याने नियमानुसार प्रवेश देता येणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी गुरुवारच्या पालखी सेवेचा दाखला देत मंदिरात प्रवेश द्यावा, अशी ठाम भूमिका घेतली. गोंधळ वाढल्याने पोलिसांनी सोहळाप्रमुख विकास ढगे व राजाभाऊ चोपदार यांना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यास सांगितले. त्यांनीदेखील संवाद साधत वस्तुस्थिती सांगितली. कायदा व सुव्यवस्था राहावी यासाठी गर्दी नियंत्रण गरजेचे असल्याचे सांगितले. ढगे पाटील यांनी तीस लोक विनंतीवरून आत घेऊ, यादी करा, असे सांगितले तर चोपदार यांनीदेखील याच आशयाची भूमिका घेतली. त्यावर विद्यार्थ्यांचे समाधान न झाल्याने गोंधळ सुरूच राहिला काही वेळाने विद्यार्थ्यांनी सुरक्षा व्यवस्था भेदून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.

पालखी सोहळा प्रमुख अ‍ॅड.विकास ढगे पाटील, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी लेखी निवेदन प्रसिद्ध करत त्यात हे स्पष्टीकरण दिले असून, वारकरी विद्यार्थी दर गुरुवारी पालखी प्रदक्षिणादरम्यान नित्य सेवा देतात त्यांची ही सेवा कौतुकास्पदच आहे. मात्र, त्याच सेवेचा हक्क सांगत प्रस्थान सोहळ्यात तीनशे ते चारशे वारकरी विद्यार्थ्यांना अधिकृत पास नसताना, नियमात बसत नसताना आत घेणे शक्य नव्हते. मात्र, ऐच्छिक सेवेला मान,आदर म्हणून काही मर्यादित प्रवेश देण्यास तयार होतो. मात्र, हा प्रस्ताव संबंधित विद्यार्थ्यांनी मान्य केला नसल्याचे म्हटले आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT