पुणे

पिंपरी : कडाका वाढला तापमान 18.1; दुपारी जाणवतोय उकाडा

अमृता चौगुले

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा: पिंपरी- चिंचवडचे किमान तापमान 18.1 अंश इतके नोंदविले गेले आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत थंडी, दुपारी कडक ऊन व रात्री थंडी असा अनुभव शहरवासीयांना येत आहे. दिवाळी संपली आणि लगेचच थंडीचा कडाका सुरु झाला आहे. थंडीचा कडाका जाणवत असल्याने नागरिक ऊबदार कपडे घालूनच बाहेर पडत आहेत.

परंतु सकाळी अकरा नंतर मात्र ऊन तापत असल्यामुळे डोक्याला व तोंडाला रुमाल बांधूनच बाहेर पडावे लागत आहे; तसेच चहाच्या टपर्यांवर गर्दी वाढत आहे. घरामध्ये व कार्यालयातही पंख्यांची घरघर कमी झाली आहे. घरामध्ये ठेवणीतल्या रजई व ब्लँकेट्स बाहेर निघू लागली आहेत. वस्त्यांमध्ये शेकोट्या पेटविल्या जात आहे. बाजारपेठात व रस्त्यावरही ऊबदार कपड्यांची विक्री वाढली आहे.

व्यायामाचा उत्साह
हिवाळ्यात उष्मांक वाढविण्यासाठी आहाराबरोबर व्यायामदेखील करणे महत्त्वाचे आहे. दिवाळीत फराळाचा मनसोक्त आस्वाद घेतल्यानंतर वजन वाढू न देता फिट राहण्यासाठी नागरिक व्यायामावर भर देत आहेत. थंडीतील प्रसन्न वातावरणात व्यायाम करणार्‍यांचा उत्साह दिसून येत आहे. लागोपाठ आलेल्या सणासमारंभामुळे वाढलेले वजन उतरविण्यासाठी चालणे, जीम जॉईन करणे असे फंडे आजमावले जात आहेत. यातील बहुतेकांना चांगल्या आरोग्यासाठी तर काहींनी वजन कमी करण्यासाठी, फिट दिसण्यासाठी व्यायाम करायचा आहे. त्यामुळे उद्यानात असलेल्या ओपन जीम, रस्त्यावर फिरणार्‍यांची संख्या वाढत आहे.

उष्मांक वाढविणारा आहार घेण्याकडे कल
सध्या ऐन थंडीच्या दिवसांत थंडीपासून संरक्षण म्हणून उष्मांक वाढविणारा आहार घेण्याकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे. यामध्ये तीळ, बाजरी, सुका मेवा अशा उष्मांक वाढविणार्‍या आहाराचा समावेश केला जात आहे. या दिवसात बाजरीची भाकरी, ठेचा, वांग्याचे भरीत असा फक्कड बेत घरात आखला जातो. थंडीमुळे चहाच्या टपरीवर देखील ग्राहकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे चहा, कॉफी आदी पर्याय ठेवत आहेत. यामध्ये मसाला चहा, जायफळ, वेलची, आले, गवती चहा असे प्रकार पहायला मिळतात.

थंडीमुळे तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. रक्तवाहिन्यांवर थंडीमध्ये परिणाम होतो. थंडमध्ये बाहेरी पडताना ऊबदार कपडे घालावेत. श्वसन विकार असणार्यांनी सकाळी फिरायला जाताना मास्क लावणे गरजेचे आहे. खोकला, दमा असणार्‍यांनी कोमट पाणी प्यावे. तसेच थंडीमध्ये आईस्क्रिम व थंड पेयांचे सेवन करू नये. प्रथिनयुक्त आहाराचा समावेश करावा. मेद घटकांचा जास्ती प्रमाणात वापर असू नये.

                                         – डॉ. किशोर खिलारे (अध्यक्ष, जनआरोग्य मंच, पुणे)

SCROLL FOR NEXT