पुणे

पुणे : डिकसळ पुलाखालील गुतावाचे दगड निखळले ; महाडपेक्षाही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता

अमृता चौगुले

भिगवण : पुढारी वृत्तसेवा : तब्बल १६५ वर्ष जुना व ४० वर्षे पाण्याची खस्ता खात उभा असलेला पुणे व सोलापुर जिल्ह्यातील २५ ते ३० पुनर्वसित गावांना जोडणारा ब्रिटिशकालीन डिकसळ पुलाचे पाण्याखालील बाजूचे गुतावाचे दगड अखेर निखळू लागले आहेत. यामुळे महाडपेक्षाही मोठी दुर्घटना आता नाकारता येत नाही. या पुलावरून जड वाहतुकीला बंदी असताना राजरोसपणे जड वाहतूक अहोरात्र सुरू असते यावरून हा पूल कमकुवत व धोकेदायक बनल्याचे वृत्त दै. 'पुढारी'ने वेळोवेळी प्रसिद्ध केले होते. मात्र प्रशासन तेवढ्यापुरती दखल घेते व पुन्हा परिस्थिती जैसे थे होते हे चित्र आहे. मात्र शनिवारी (दि. १४) सकाळी पुलाच्या पूर्वेला पाण्याखालील बाजूचे दगडांचे गुताव निखळल्याचे स्थानिक मच्छिमारांच्या निदर्शनास आले, त्यानंतर एकाच खळबळ उडाली.

याबाबत थोडक्यात माहिती अशी की, उजनी निर्मितीपूर्वी डिकसळ पुलावरून रेल्वे वाहतूक होती. मात्र उजनी निर्मितीनंतर रेल्वे बंद झाल्याने या पुलाचा वापर पुणे व सोलापुर जिल्ह्यातील गावांना वाहतुकीसाठी होऊ लागला. हा पुल पुनर्वसित गावांचा दुवा बनला असुन, हा पुल नसता तर या सर्व गावांना दळणवळणासाठी ५० ते ६० किलोमीटरचा वळसा घालावा लागला असता.

पुल जीर्ण झाल्याने इंग्रज सरकारने भारत सरकारला पूर्वीच कळविले आहे. त्यानंतर पुणे व सोलापुर प्रशासने या पुलावरून जड वाहतुकीला बंदी घातली. काहीवेळा अडथळे निर्माण केले; मात्र तरीही जड वाहतूक सुरूच राहिली आहे. दरम्यान आता मात्र पुलाच्या मध्यभागी व पाण्याखालील बाजूने याचे दगड निखळू लागले आहेत. पाच ते सहा फूट अंतरतील दगड निखळल्याने पुढे आता खिंडार पडण्याचा व पूल कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पुणे व सोलापुर प्रशासनने जड वाहतुकीवर पूर्ण बंदी घालुन आणि नागरिकांची गैरसोय न होता उपाययोजना आखणे गरजेचे बनले आहे.

 तर मोठी संक्रात

जुना दगड, चुना मातीतील शिवकालीन, ब्रिटिशकालीन कोणत्याही वास्तू व त्याचे बांधकाम पाहता हा गुताव सहजपणे निखळत नाहीत आणि निखळू लागले तर ते अवघड बनते, तसेच या पुलाचे झाले आहे. पाण्याखालील भाग निखळू लागला आहे. आता पाण्याच्या लाटा त्यावर आढळण्याचा धोका अधिक असल्याने येत्या काही दिवसात हा पूल ढासळण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास दोन्ही बाजूंच्या ३० ते ४० गावांचा संपर्क तुटेल व पुनर्वसित गावांतील रुग्ण व अत्यावश्यक सेवा विस्कळित होईल.

निधी मंजूर पण लालफितीत

डिकसळ पुल जीर्ण झाल्याने व संभाव्य धोका लक्षात घेऊन या ठिकाणी पुनर्वसित गावांची गैरसोय टाळण्यासाठी नवीन पुलासाठी ५५ कोटी रुपयांचा निधी मंजुर केलेला आहे; मात्र त्यावर एकदा स्थगिती देण्यात आली व २०२२ मध्ये ती उठवण्यात देखील आली. परंतु कशात माशी शिंकली हे कळले नाही आणि अजूनही कामाला मुहूर्त मिळालेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT