पुणे: ससून रुग्णालयाला शासनाकडून हिमोफिलिया या रक्ताशी संबंधित दुर्मीळ आजाराच्या रुग्णांसाठी औषधांचा पुरवठा केला जातो. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात हिमोफिलियाच्या औषधांचा पुरवठा करणारी 36 केंद्रे आहेत. त्यामध्ये बी. जे. मेडिकल कॉलेज तथा ससून रुग्णालयाचा समावेश आहे. मात्र, यापुढे निधी अभावी ससूनला शासनाकडून औषधांचा पुरवठा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या औषधांसाठी रुग्णांना ससेहोलपट करावी लागणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सहायक संचालकांनी याबाबत राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाला पत्र दिले आहे. ससून रुग्णालयाला अँटिहिमोफिलिक घटक (इंजेक्टेबल्स) खरेदी करण्यासाठी दिलेला निधी यापुढे दिला जाणार नाही. ससून हे तृतीयक रुग्णालय (टर्शरी केअर) असल्याने वैद्यकीय महाविद्यालयांसाठी घटकांची शिफारस केलेली नाही, असे पत्रात नमूद केले आहे.
हिमोफिलियाच्या रुग्णांवर होणार परिणाम
राज्यात हिमोफिलियाचे अंदाजे 5000 रुग्ण आहेत. ससून हे हिमोफिलियावरील औषधांसाठी शासनातर्फे नियुक्त झालेले रुग्णालय आहे. ससूनमधील औषधांसाठी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाने निधी देणे अपेक्षित आहे, असे पत्रात म्हटले आहे. हिमोफिलियासाठी चालवली जाणारी इतर केंद्रे जिल्हा रुग्णालयांतर्गत येत असून, सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे चालवली जातात. शासनाच्या या निर्णयाचा रुग्णांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
आत्तापर्यंत सार्वजनिक आरोग्य विभाग राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेंतर्गत महाराष्ट्रातील नियुक्त रुग्णालयांना हिमोफिलिकविरोधी घटकांसाठी निधी उपलब्ध करून देत होता. राज्यातील 36 केंद्रांपैकी पुणे जिल्ह्यात ससून रुग्णालय आणि औंध जिल्हा रुग्णालयाचा समावेश आहे. नुकत्याच मिळालेल्या सूचनांनुसार, केंद्रीय आरोग्य विभाग केवळ सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या रुग्णालयांमध्ये हिमोफिलियावरील औषधे देणार आहे. बीजे वैद्यकीय महाविद्यालय डीएमईआरअंतर्गत येत असल्याने त्यांच्याकडून औषधांसाठी निधीची तरतूद केली जाणे अपेक्षित असल्याचे पत्रात नमूद केले आहे.- डॉ. महेंद्र केंद्रे, सहायक संचालक (रक्तपेशी), आरोग्यसेवा संचालनालय